मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दूध भेसळीचा मुद्दा तापला आहे! भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज विधानभवन परिसरातच दूध भेसळ कशी होते, याचा 'लाईव्ह डेमो' दाखवून सर्वांनाच धक्का दिला. युरिया, तेल, चुना आणि केमिकल्स वापरून एक लिटर दुधाचे चक्क दहा लिटर दूध कसे बनवले जाते, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले. या 'दूध माफिया'ंवर कठोर कारवाई करण्याची आणि अजामीनपात्र जन्मठेपेची मागणीही त्यांनी केली.
मुंबई : जनसुरक्षा विधेयक हे विधासभेमध्ये काल मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. या विधेयकामुळे ...
'एका मोठ्या पुढाऱ्याची डेअरी!' - पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा?
गोपीचंद पडळकर यांनी थेटपणे आरोप केला की, "युरिया आणि तेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जाते. हे सर्व आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळाले आहे. तिथे एका मोठ्या पुढाऱ्याची दूध डेअरी आहे. राज्याचे पुढारी म्हणतात, पण तुम्ही काय करत आहात?" असा सवाल उपस्थित करत पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
पडळकर म्हणाले, "शेतकरी दुधात भेसळ करत नाहीत, तर डेअरीवालेच भेसळ करून गब्बर झाले आहेत. हे शेतकरी आणि ग्राहकांशी खेळत आहेत. एक लाख लिटर दूध गोळा झाले की त्याचे तीन लाख लिटर दूध डेअरीवाले तयार करतात, म्हणजे एक लिटरचे दहा लिटर दूध तयार होत आहे. अशा सर्वांना तुरुंगात टाकले पाहिजे आणि दूध भेसळीबाबत कडक कायदा तयार करण्यात यावा."
सदाभाऊ खोत यांची मागणी: 'जन्मठेप झालीच पाहिजे!'
सदाभाऊ खोत यांनीही पडळकरांच्या मागणीला दुजोरा दिला. ते म्हणाले, "राज्यात म्हशीचं ८० ते ९० लाख लिटर आणि गाईचं १ कोटी २५ लाख लिटर दूध तयार होतं. पण भेसळयुक्त दूध बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुधाच्या दरात कमिशन मिळते. दूध माफिया शेतकरी आणि ग्राहकांना लुटून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. अशांना कडक शिक्षा, अजामीनपात्र जन्मठेप झालीच पाहिजे, तरच शेतकरी वाचेल."
'लाइव्ह डेमो'ने विधानभवन हादरले!
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवन परिसरात चक्क एक मिक्सर, दूध आणि पाण्याच्या बाटल्या, चुना आणि काही केमिकल्स घेऊन येत, दूध भेसळ कशी केली जाते, याचे प्रात्यक्षिकच दाखवले. दुधात तेल, चुना आणि वासासाठी केमिकल वापरून ते कसे बनावट दूध तयार करतात, याचा त्यांनी सविस्तर 'डेमो' दिला.
पडळकर यांनी यावेळी मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये सर्रास भेसळयुक्त दूध विकलं जात असल्याचा आरोप केला. "शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे, म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. या भेसळीमुळे लोकं मरायला लागली आहेत. लहान मुलांना हे दूध पाजले जाते. कॅन्सर किंवा इतर रोग वाढण्यामागे हे केमिकल्स जबाबदार आहेत. सरकारने तात्काळ यावर निर्णय घ्यावा," अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.
शेतकरी आणि सामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या दूध माफियांचा पर्दाफाश केल्याबद्दल पडळकर आणि खोत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता सरकार यावर काय कठोर पाऊल उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.