अंत्यसंस्काराची तयारी; तो चक्क जिवंत परतला घरी आणि एका क्षणात वातावरण बदलले

जळगाव : रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला. घरी सर्व नातेवाईक आले आणि रडारड सुरू झाली. मात्र, ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली, ते रघुनाथ वामन खैरनार (६५, रा. पाळधी, ता. धरणगाव) हे इथे बसले आहेत’, असे सांगणारा फोन आला आणि तो खराही निघाला. अचानक रघुनाथ खैरनार हे घरी परतल्याने कुटुंबीय, नातेवाईक थक्क झाले आणि हा नेमका काय चमत्कार आहे, या विचारात पडले. प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटविली, तो दुसऱ्याचाच असल्याचे स्पष्ट झाले आणि तो पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परत नेण्यात आला.


धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरून निघून गेले होते. बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत असताना शनिवारी (दि. ५) सकाळी पाळधी गावाजवळच रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला. ही माहिती गावात पसरताच गावकऱ्यांसह बेपत्ता वृद्धाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसही आले. पण आत्महत्या करणाऱ्या माणसाचा चेहराच नष्ट झाल्यामुळे हा माणूस कोण आहे, हे मात्र कळत नव्हते. पाळधीतील मिलिंद भालेराव यांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले, हा तर आमचा रघुनाथ खैरनार.


रघुनाथ खैरनारांच्या घरी बातमी पोहोचली. रडारड सुरू झाली. त्यांचा मुलगा पुण्यात असतो. त्यालाही फोन करून बोलावण्यात आले. मृतदेह तिथून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घरी तिरडी आणली गेली, अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला. मुलगाही पोहोचला. अंत्ययात्रेसाठी मृतदेह घरी पोहोचणार, तेवढ्यात ‘रघुनाथ खैरनार तर इथे बसले आहेत’, असे सांगणारा फोन आला. खरे तर आत्महत्या – करणारी व्यक्ती होती पथराड येथील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील. त्यांचेही वय – ५५ व अंगकाठी, कपडेही रघुनाथ खैरनार घालतात तसेच. तेही सकाळपासून घरून बेपत्ता झाले होते व त्यांचे कुटुंबीय त्यांचा पथराड परिसरात शोध घेत होते. पण त्यांनी आत्महत्या केली असेल, याची त्यांना कल्पना आली नाही. पोलिसही रघुनाथ खैरनार म्हणूनच त्यांचा मृतदेह हाताळत राहिले. शवविच्छेदन झाले तेही त्याच नावाने.


मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळण्यात आला व तो पाळधीकडे रवानाही करण्यात आला. पण मुलगा पुण्याहून घरी पोहोचायचा होता. त्यामुळे शववाहिनी पाळधीच्या पेट्रोल पंपाजवळच थांबवून ठेवण्यात आली होती. मुलगा सायंकाळी घरी पोहोचला आणि तेवढ्यात गावातील एकाचा फोन आला, ‘रघुनाथ तर इथे बसला आहे’. सांगणारा खरेच सांगत होता; पण विश्वास कोण ठेवणार? खात्री करण्यासाठी व्हिडिओ कॉल करायला सांगण्यात आले. त्यांनी केलाही. पलीकडे बसलेले रघुनाथ खैरनार हात हलवून आपण जिवंत असल्याचे सांगत होते. एका क्षणात वातावरण बदलले. यामुळे नातेवाईक, कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला व दुसरीकडे बाबांना जिवंत पाहून आनंदही गगनात मावेनासा झाला. सर्व हकीकत समजल्यानंतर पाळधी पोलिसांना कळवून मृतदेह रुग्णालयात परत नेण्यात आला.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह