महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा
विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे विमा संरक्षण देण्यात येणार असून, दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करणे सोपे व्हावे याकरिता महापालिका मुख्यालयासह ९ प्रभागांमध्ये एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.
दहीहंडी उत्सवासंदर्भात महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार डॉ. हेमंत सवरा, आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार, प्रथम महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन बाळा पडेलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस उप-आयुक्त दीपक झिंजाड यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मागील वर्षी महानगरपालिकेत नोंदणी केलेल्या ९९ गोविंदा पथकांना महानगरपालिकेने मे. दि ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत विमा संरक्षण काढून दिलेले होते.
९९ गोविंदा पथकांमध्ये एकूण ६ हजार गोविंदांचा समावेश होता. महानगरपालिकेकडे मागणी केल्यास उत्सवाच्या ठिकाणी विशेषतः महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी सांगितले.
गोविंदांवर होणार मोफत उपचार
उत्सव काळात कोणत्याही गोविंदाला दुखापत झाल्यास मनपा रुग्णालयामार्फत मोफत उपचार करण्यात येतील. तसेच आयोजकांना उत्सवाचे आयोजन करण्यासाठी एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांच्या परवानग्या प्राप्त व्हाव्या यासाठी महानगरपालिकेमार्फत लवकरच ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच या परवानग्या विनामुल्य देण्यात येतील असे आयुक्त पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच उत्सवाच्या ठिकाणाजवळ लगतच्या क्षेत्रातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन व्यवस्थेचा उपयोग करण्यात येईल.
डॉक्टर असोशिएशनची मदत घ्या : खासदार
सर्व आयोजकांनी न्यायालय व शासनाने दिलेल्या नियमानुसारच उत्सव साजरा करावा, गोविंदाना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना आयोजकांनी कराव्यात, १४ वर्षांखालील मुला-मुलींचा समावेश गोविंदा पथकात करू नये, उत्सवात गोविदांना अपघात झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार मिळणेसाठी उत्सवाच्या ठिकाणाहून सर्वात जवळ असलेल्या रुग्णालयाची विशेषतः अस्थीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या रुग्णालयांची माहिती करून ठेवण्याचे व यात डॉक्टर असोसिएशनची मदत घेण्यात यावी असे आवाहन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी यावेळी केले.