भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली!
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु होती. अखेर आज ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा ठाकरे बंधूंना एकत्र घेऊन आला. ठाकरे बंधूंच्या ग्रँड सोहळ्यातील भाषणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीमधील नेते राजकीय टीका टिपण्णी देखील करत आहेत. मेरीटच्या विद्यार्थ्याला भीती नसते, असे म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. तर, मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी असल्याचे भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली असता खासदार राहुल गांधी यांचा फोटो ...
मराठीच्या गोंडस नावाखाली गायलं शोकगीत
भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावरच शरसंधान साधले. 'मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाही, तर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे,' अशी टीका बावनकुळेंनी केली.
आशिष शेलारदेखील उद्धव यांच्यावरच बरसले...
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारदेखील उद्धव यांच्यावरच बरसले. 'महापालिका निवडणुकाजवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता भाऊबंदकी आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार... त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे.. निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब"तहात" जिंकण्याचा प्रयत्न !!', अशा शब्दांत शेलारांनी उद्धव यांच्यावर तोंडसुख घेतलं. तर काल राज यांच्यावर तुटून पडलेल्या भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी आज उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. त्यांनी राज यांच्यावर बोलणं टाळलं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना काय काय त्रास दिला होता आणि आज त्यांच्या समोर उद्धव ठाकरेंला नाक घासावं लागलं, असं राणे म्हणाले. आता मुस्लिम लीगसोबत युती करा तेच शिल्लक आहे, असंही नितेश राणेंनी म्हटलं.
मेरीटच्या विद्यार्थ्याला चिंता करायची गरज नाही- मुनगंटीवार
उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते राज्याच्या प्रगतीसाठी काही विषय मांडतील, शोषित पीडित जनतेसाठी काही विषयांची मांडणी करतील ही अपेक्षाच नाही. दोन भाऊ एकत्र आले याचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं हा त्यांचा विषय आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने आम्ही आमचा अभ्यास काही कमी करणार नाही, मेरीटच्या विद्यार्थ्याला याची चिंता करायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, मराठी-मराठेत्तर संघर्ष निर्माण करुन भाजपने सत्ता मिळवली हे म्हणणं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा वेगळ्याच दिशेला विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.
भुजबळ काय म्हणाले...
कोणी कुठलेही कुटुंब एकत्र येत असतील तर आनंदच आहे, राजकीय दृष्टीने ते एकत्र येथील का हे माहिती नाही. राज ठाकरे बाहेर का पडले त्या कारणाचे काय झाले? ते मिटले का अजून माहिती नाही. त्यामुळे, ठाकरे बंधूंचे मनोमिलन होईल का ते पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच, मराठीने त्यांना एकत्र आणले आहे, शिवसेना मराठी विचारातूनच जन्माला आलेली आहे. सध्या, त्रिभाषा सूत्र बाबत अनेक राज्यात अभ्यास सुरू आहे, असेही ते म्हणाले.