पाच कसोटी सामन्यांची मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची इंग्लंडमध्ये सुरू आहे. इंग्लंडने हेडिंग्ले, लीड्स येथे झालेली पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकली. आता दुसरी कसोटी एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारत २४४ धावांनी आघाडीवर आहे. बर्मिंगहॅमच्या कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात सर्वबाद ५८७ धावा केल्या. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात सर्वबाद ४०७ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक बाद ६४ धावा केल्या. यामुळे बर्मिंगहॅमच्या कसोटीत भारताचे पारडे जड दिसत आहे.
पंचांवर भडकला बेन स्टोक्स
भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी छान सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वाल २८ धावा करुन बाद झाला. याआधी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही जोडी लवकर फुटत नसल्याचे बघून बेन स्टोक्स अस्वस्थ झाला होता. भारताच्या दुसऱ्या डावात आठव्या षटकात जोश टोंगचा चेंडू यशस्वी जयस्वालच्या पॅडला लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी अपील केले. पंच शरफुद्दौला यांनी अपील स्वीकारत यशस्वी जयस्वाल बाद असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय येताच यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी आपापसात चर्चा केली. नंतर यशस्वी जयस्वालने रिव्ह्यू मागितला. पंचांनी रिव्ह्यू मागायची परवानगी दिली. पण रिव्ह्यू मागण्यासाठी असलेला उपलब्ध असलेला १५ सेकंदांचा कालावधी संपला असल्याचे सांगत बेन स्टोक्सने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो पंचांवर भडकला. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी पंचांविरोधात बोंबाबोंब सुरू केली. पण रिव्ह्यूला परवानगी मिळाली होती म्हणून तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या मदतीने नेमके काय घडले ते तपासले. अखेर तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर बेन स्टोक्सचा दावा खरा होता का याचीही तपासणी झाली, त्यात स्टोक्सच्या दाव्यात तथ्य आढळले. अखेर बाद झालेला यशस्वी जयस्वाल मैदानाबाहेर गेला. नंतर केएल राहुल आणि करुण नायर यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी पडझड होणार नाही याची खबरदारी घेतली.