आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष
विरार : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण रखडलेले आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेला यावर्षी सोळा वर्षे पूर्ण होत असताना सुद्धा शाळा हस्तांतरणाचा विषय "जैसे थे"च असल्याबाबत आमदार राजन नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. वसई, विरार, नालासोपारा आणि नवघर - माणिकपूर या चार नगरपालिकांसह ५३ गावांचा समावेश करीत ३ जुलै २००९ रोजी वसई-विरार महानगरपालिका स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासूनच महापालिका कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ११७ शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचा विषय सुरू झाला. अनेकदा हा विषय महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दप्तरी नोंदवला गेला आहे. मात्र अद्याप शाळांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आलेले नाही. महानगरपालिका प्रशासन गेल्या वर्षभरापासून पालघर जिल्हा परिषदेकडून मागवत आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या ११७ शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत किती शाळा आहेत त्यासोबतच खासगी किंवा संस्थांच्या जागांवर कितीशाळा बांधण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांची संख्या, त्यांना देय असलेले मासिक वेतन, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या, मंजूर पदे अशा सर्व प्रकारची माहिती जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आली आहे. या ११७ शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा जिल्हा परिषदेने तत्काळ हस्तांतरित करून द्याव्या या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.