मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं आतापर्यंत मराठीसाठी? अशी खरमरीत टीका माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. या दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे त्यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गेले होते. याठिकाणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रचारसभा घेतली होती. मात्र, आता मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने उभे राहत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर नेहमीच्या शैलीत टीकेची तोफ डागली आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय केलं आतापर्यंत मराठीसाठी?
नारायण राणे यांनी ठाकरे बंधुंवर टीकास्त्र डागताना म्हटले की, ही दोन भावांची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड असून ते दोघेही स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. दोन भाऊ एकत्र येणार असतील तर एवढा गवगवा का? एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं आतापर्यंत मराठीसाठी? मराठी तरुणांच्या नोकरी - रोजगाराच्या प्रश्नावर काय केलं यांनी? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयाला कोणाची सही आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का नाही निर्णय रद्द केला, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंच शिवसेनेत राहणं असहाय्य्य
घरगुती भांडणं चव्हाट्यावर आणणं योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावं. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राहणं असहाय्य्य केलं. राज यांचा एकही निर्णय मान्य केला जात नव्हता. उद्धव ठाकरेंसोबत आज कोणीही नाही. दोन भाऊ एकत्र आले तर मला शब्दात सांगता येत नाही इतका आनंद होतोय. किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिलाय? यासाठी जबादार कोण? हे सोयीचं, फायद्याचं आणि परिवाराच्या स्वार्थाचं राजकारण आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली.
मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा!" अशा बोचऱ्या ...
उद्धव ठाकरेंकडे एकही गुण चांगला नाही
भाजपला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. दोघे एकत्र येण्याने आम्हाला काही धक्का बसणार नाही. आम्ही मराठी नाही का ? आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मराठी माणसासाठी काम केलंय. मला उद्धव ठाकरेंचा एकही चांगला गुण मला माहिती नाही. पण राज ठाकरेंचा स्वभाव रोखठोक आहे. शिवसेनेने अडीच वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावले. राज ठाकरे चुकतायत की नाही, हा माझा प्रश्न नाही. काही हाताशी लागणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटलंय.
अंतिम निर्णय कोर्ट सुनावत नाही तोपर्यंत मी मानणार नाही
नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. मी दिशा सालियन प्रकरण यावर बारीक नजर ठेवून आहे. एसआयटीने दिलेला रिपोर्ट खराच असेल असं नाही. अनेक पोलीस रिपोर्ट खोटे असतात. रिपोर्ट काही असला तरी माझा विश्वास नाही. अंतिम निर्णय कोर्ट सुनावत नाही तोपर्यंत मी मानणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.