अभिनयासोबत निर्मिती देखील

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


नूतन जयंत या अभिनेत्रीने अभिनयासोबत निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. अभिनय हा तिचा आत्मा आहे, तो आयुष्यभर ती करीतच राहणार आहे. त्यासोबत चांगली निर्मिती करताना तिला समाधान मिळते. शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे अनेक लघुपटाची निर्मिती ती करत आहे. तिचा जन्म ठाण्यात झाला. ठाण्यातील मो. ह. विद्यालयामध्ये तिचे शालेय शिक्षण झाले.


शाळेत असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला होता. ठाण्यातील मंजिरी देवकडे तिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. कबड्डीमध्ये ती अग्रेसर होती. रनिंगमध्ये ती नेहमी पहिली यायची. लग्नानंतर तिचे पती जयंत यांनी तिला अभिनयासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे तिने आजवर अभिनयाच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. एकदा स्पर्धात्मक नाटकात काम करताना तिथे अभिनेते, निर्माता व दिग्दर्शक जनार्दन लवंगारे आले होते त्यांनी नूतनला एका नवीन नाटकात काम करणार का? अशी विचारणा केली. तिने होकार दिला, ते नाटक प्रेक्षकांना खूप आवडलं आणि नाटकाचं नाव होतं ‘नो टेन्शन’. अभिनेते विजय कदमच्या नायिकेच्या भूमिकेत ती होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही, तिच्या अभिनयाची घौडदौड सुरू झाली. ‘सदा सर्वदा’ या नाटकाचे तिने भरपूर प्रयोग केले. ‘बायको कमाल मेहुणी धमाल’ या नाटकात ती काम करू लागली. हे नाटक खूप गाजलं. एकदा त्या नाटकाच्या प्रयोगाला अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक महेश कोठारे पत्नीसह आले होते. नाटकात मध्यंतरात ते नूतनला येऊन भेटले व दुसऱ्या दिवशी तिला घरी बोलावले. घरी गेल्यानंतर त्यांनी तिला अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका म्हणून साइन केले. पाचशे एक रुपये दिले व दुसऱ्या दिवसापासून कोल्हापूरला शूटिंग सुरू झाले. लक्ष्मीकांत बेर्डे सोबत अजून काही चित्रपट तिने केले. लक्ष्मीकांतची ती शेवटची नायिका ठरली. ‘खतरनाक’ चित्रपटाची पुण्याला पार्टी झाली, पार्टीमधील सगळ्यांना तो चित्रपट खूप आवडला. ‘अगं वासंती तुझ्या मनात काय’ हे तीचं गाणं त्यवेळी खूप गाजलं. त्यावेळी दर गुरुवारी दूरदर्शनवर ते गाणे दाखविले जायचे.


दूरदर्शनसाठी ‘मुंबई फाईल’ ही पोलिसांवर आधारित मालिका तिने अशोक शिंदेंसोबत केली. त्या मालिकेचे शंभर भाग केले. पुष्कर श्रोत्रींसोबत ‘मस्त धमाका’ मालिका केली. ‘अलबेला’ नाटकासाठी तिला ‘झी’ने लक्षवेधीसाठी नामांकन दिले होते. २८ चित्रपट, २२ व्यावसायिक नाटक, १९ मालिका तिने केल्या. वादळवाट, सप्तपदी या तिच्या मालिका गाजल्या.


२००४ साली तिने दिल्लीला ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा मोठा कार्यक्रम केला होता. एन. जे. प्रोडक्शनच्या वतीने शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे लोकजागृतीसाठी अनेक लघुपट तिने निर्माण केले. अहिल्याबाई होळकरांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर नाटक बसविण्यात आले होते. त्यामध्ये अहिल्याबाईंची भूमिका तिने साकारली होती. भार्गवी चिरमुले, देवदत्त नागे हे इतर नामवंत कलाकार देखील त्यात होते. या भूमिकेबद्दल काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या का? असे विचारले असता ती म्हणाली की, अहिल्याबाई होळकरांची ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना खूप सावधगिरी बाळगावी लागली. लोकांच्या भावना दुखावू नये हा प्रयत्न मी केला. या नाटकाच्या एका शोला त्यांच्या नवव्या वंशज सुनबाई हजर होत्या. नाटक संपल्यावर त्या स्टेजवर आल्या आणि त्या नूतनजींच्या पाया पडल्या. त्यावेळी नूतनला खूप गहिवरून आले. तिच्या कामाची तिला मिळालेली ती पावती होती. हे नाटक पाहून झाल्यावर सांस्कृतिक मंत्री आशीषजी शेलार व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तिचे कौतुक केले. हल्लीच तिने शासनाच्या खारफुटी जंगलावर आधारित लघुपटाची निर्मिती केली. ‘संविधान’ या विषयावरील नाटक करण्याची तिची इच्छा आहे. त्यावर काम सुरू आहे. नवीन चांगल्या विषयाची निर्मिती अभिनयासोबत करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळकटी मिळू दे. तिच्या अभिनयासोबत चांगली निर्मिती प्रेक्षकांना पाहायला मिळू दे, यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

भारतातील पहिले एआय-आधारित तिकीट बुकिंग व्यासपीठ ‘थम्पएन’ सुरू

देशातील लाइव्ह मनोरंजन क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित पहिले डिस्कव्हरी आणि तिकीट बुकिंग

रंगभूमी आणि बदलता विनोद...

मराठी नाट्यक्षेत्रात सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा उपक्रम अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसून येत

आसमंताच्या रंगमंचावरचे 'आषाढ नाट्य'

राजरंग-राज चिंचणकर आषाढ महिन्याची चाहूल लागली की कवी कुलगुरू कालिदासाने 'मेघदूत' या महाकाव्यात वर्णन केलेल्या

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे मिळाली ओळख

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल      रात्रीस खेळ चाले’ या भयपट मालिकेमुळे अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर

'बाईंची शाळा': एक आठवण

मराठी रंगभूमीवर 'बाई' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी या आठवड्यात आयुष्याच्या

रंगभूमीवरच्या कुटुंबात ‘नूपुर’ नाद...

राजरंग-राज चिंचणकर   कााही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत