रंगभूमीवरचा ‘पठाण’... वय वर्षे ८५...

राजरंग : राज चिंचणकर


रंगभूमीवर ऐन उमेदीच्या काळात साकारलेल्या भूमिका, त्या कलावंतांनी वयोपरत्वे रंगभूमीवरून ‘एक्झिट’ घेतली तरी त्यांच्या स्मृती कायम राहतात. अनेक कलाकार वार्धक्याने थकतात आणि त्यांच्या युवावस्थेतल्या भूमिका मनात आठवत राहतात. पण काही गोष्टींना अपवाद असतात. मराठी रंगभूमीवर असाच एक अपवाद आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी विलास गुर्जर यांचा...! रंगभूमीवर अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेले विलास गुर्जर यंदा २१ जून रोजी वयाच्या ८५ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. ‘रंगभूमीवरचा पठाण’ अशी ओळख लाभलेले विलास गुर्जर आजही रंगभूमीची सेवा करण्यास तयार आहेत.


आतापर्यंत विलास गुर्जर यांनी अनेक नाटकांत विविध प्रकारच्या भूमिका रंगवल्या आहेत. मात्र नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकातली ‘पठाण’ ही भूमिका त्यांनी अशाप्रकारे रंगवून ठेवली आहे की, आजही त्यांना या भूमिकेमुळे विशेषत्वाने ओळखले जाते. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाच्या गेल्या साठ वर्षांत झालेल्या हजारो प्रयोगांमध्ये त्यांनी ‘पठाण’ रंगवलाच; परंतु दहा वर्षांपूर्वी म्हणजे या रंगकर्मीची ऐन पंच्याहत्तरी साजरी होत असतानाही, त्यांनी या नाटकात त्यांची हातखंडा ‘पठाण’ ही भूमिका रंगवत रसिकांना आश्चर्यचकित केले होते. आजही कुणी हे नाटक रंगभूमीवर आणले तर त्यात ‘पठाण’ साकारण्यास ते सज्ज आहेत. त्यांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…


रंगभूमीवरच्या तुमच्या कारकिर्दीला सुरुवात कधीपासून झाली?
माझ्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली ती सुधाताई करमरकर यांच्या ‘लिट्ल थिएटर’ या नाट्यसंस्थेपासून...! लहानपणी मला बालनाट्यात काम करायची खूप इच्छा होती आणि सुधाताईंच्या संस्थेत मला काम करायला मिळाले. तिथे बालनाट्यांचे मी जवळपास एक हजार प्रयोग केले.


व्यावसायिक रंगभूमीवर तुमचे पहिले पाऊल कसे पडले?
बालनाट्यांतल्या माझ्या कामामुळे ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’चे नाटक मला मिळाले. गोपीनाथ सावकारांनी दिग्दर्शित केलेले ‘करीन ती पूर्व’ हे ते नाटक होय. त्यानंतर मला या संस्थेच्या बऱ्याच नाटकांत काम करायला मिळाले. ‘मृच्छकटिक’, ‘होनाजी बाळा’, ‘मीरा मधुरा’ ही आणि अशी अनेक नाटके मी तिथे केली. आशालता वाबगावकर, रामदास कामत अशा अनेक कलावंतांसोबत मला तिथे काम करायला मिळाले. अशा तऱ्हेने माझी व्यावसायिक रंगभूमीवरची कारकीर्द जोरात सुरू झाली. आतापर्यंत ७० व्यावसायिक नाटके मी केली असून, या नाटकांचे मिळून साधारण साडेचार हजार प्रयोग मी रंगभूमीवर केले आहेत.


‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाने तुमच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आणि यातला तुमचा ‘पठाण’ खूप गाजला...
हो. एकदा मी साहित्य संघात गेलो असताना बाळ कोल्हटकर यांचे सहाय्यक निमकर यांनी मला त्यांच्या नाटकात काम करण्याविषयी सुचवले आणि ते मला बाळासाहेबांच्या घरी येऊन गेले. त्यांनी माझी निवड केली ते नाटक म्हणजे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’. या नाटकात मला तीन पात्रे साकारायला मिळाली. रंगराव, पठाण आणि इन्स्पेक्टर अशा तीन अंकांत माझ्या तीन भूमिका होत्या. पण या नाटकातला ‘पठाण’ खूप गाजला आणि त्याचे मी जवळपास तीन हजार प्रयोग केले. या पात्राच्या एन्ट्री, एक्झिट आणि एकंदर रुबाबच बाळासाहेब कोल्हटकर यांनी अप्रतिम ठेवला होता. दहा वर्षांपूर्वी हे नाटक निर्माते किशोर सावंत यांनी पुन्हा रंगभूमीवर आणले; तेव्हा या नाटकातली एखादी वेगळी भूमिका मिळावी अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. पण माझा ‘पठाण’ इतका गाजला होता की त्यांनीही तीच भूमिका मला दिली. आताही हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले तर मोठ्या उत्साहाने मी ‘पठाण’ रंगवू शकतो.


तुमच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य काय?
माझ्या सुदृढ आरोग्याचे रहस्य म्हणजे वेळच्या वेळी जेवण, व्यायाम आणि आजही शिवाजी पार्कातला माझा फेरफटका. अवांतर कुठल्या सवयी मी लावून घेतल्या नाहीत. त्यामुळे माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. आवाजही खणखणीत आहे आणि म्हणूनच मी सांगतो की आजही रंगभूमीवर मी ठामपणे उभा राहू शकतो.


कुठली एखादी भूमिका करायची राहून गेली असे वाटते?
‘एकच प्याला’ या नाटकातला ‘तळीराम’ मला करायचा होता. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ने तेव्हा हे नाटक केले होते. पण माझ्यासोबत जयंत सावरकर कायम असल्याने व ‘तळीराम’ या पात्रावर त्याचा ‘स्टॅम्प’ घट्ट बसला असल्याने मला काही तो साकारता आला नाही. जयंत सावरकर याच्यासह राजा गोसावी, शरद तळवलकर अशा साधारण वीसजणांनी रंगवलेला ‘तळीराम’ मी पाहिला आहे. पण माझ्या वाट्याला काही ही भूमिका आली नाही, याची खंत आहे.


वयाच्या या टप्प्यावर असताना, मागे वळून पाहताना काय वाटते?
योग्यवेळी मी नाटकांत आलो; उत्तम भूमिका मला करायला मिळाल्या. आता वयाच्या ८५ व्या वर्षीही कुठलेही नाटक करण्याची माझी तयारी आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. माझे बोलणे, हालचाली वगैरे अचूक आहेत. त्यामुळे मला आजही रंगभूमीवर कुठलीही भूमिका करायला नक्कीच आवडेल.

Comments
Add Comment

Entertainment : मनोरंजन विश्वात ऐन उन्हाळ्यात गारवा...

सध्या उष्णतेच्या लाटेमुळे सर्वत्र होरपळ सुरू असताना, मनोरंजनाच्या माध्यमातून चार घटका करमणूक करणाऱ्या

Vaishnavi Kalyankar : वैष्णवीची पुढील चाल ‘घबाडकुंड’ !

घबाडकुंड’ हा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण

Case Study : बदल घडवणारी केस स्टडी ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’ !

आम्हां जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलांना व्यसनाधिनता म्हणजे काय? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ऐंशीच्या दशकात

पुस्तकांनी असे घडवले

स्मृतीगंध : लता गुठे नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी

'देऊळ' पुन्हा उघडतंय...

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक