शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, येत्या ९ आणि १० जूनला कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः १० जून रोजी सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाट परिसरात पावसाचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


तसेच, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली आणि धाराशिव या भागांमध्ये ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



पुणे व सातारा जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात सध्या पावसाची शक्यता कमी आहे, मात्र ९ ते १२ जूनदरम्यान नागपूर, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे व उपनगरांमध्येही उकाडा वाढला असून, १२ जूननंतर पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना इशारा दिला आहे, विजांच्या गडगडाटात झाडाखाली थांबू नका, विजेच्या उपकरणांपासून दूर रहा, शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. राज्यात बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस सतर्कतेची गरज असून, नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


राज्यात कुठे पावसाची शक्यता?


९ जूनला मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर १० ते १२ जूनदरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. १२जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर १५ जूननंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा, असं हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलं.


मान्सूनला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता


महाराष्ट्रात दमदार सुरुवातीनंतर थबकलेल्या मान्सूनला आता पुन्हा चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होऊन राज्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात मान्सूनने मोठा 'ब्रेक' घेतल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. २६मे रोजी मुंबईत मान्सूनचा प्रवेश झाला आणि त्यानंतर तो गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झाला, मात्र त्याचवेळी पावसाने विश्रांती घेतली. यामुळे खान्देश, नाशिक आणि विदर्भातील उत्तर जिल्ह्यांमध्ये मान्सून पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे राज्याच्या जवळपास अर्धा भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण नाही, त्यामुळे पुढील चार दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. मात्र १३ जूननंतर वातावरण मान्सूनसाठी अनुकूल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


दरम्यान, यावर्षीचा मे महिना १२४ वर्षांतील सर्वाधिक ओला महिना ठरला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मेमध्ये १२६. ७ मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या शतकभरातील उच्चांकी नोंद आहे. हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे की, मृग नक्षत्राचा पाऊस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मान्सूनची वाटचालही गती घेईल.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य