Tuesday, June 17, 2025

जलामृत की विषामृत?

जलामृत की विषामृत?

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर


वायू सजीव सृष्टीसाठी प्राण आहे तसेच जल हे सुद्धा मुख्य तत्त्व आहे. संस्कृतमध्ये आप म्हणजे पाणी. वेदांमध्ये पाण्याला दिव्य म्हटले जाते. जे शांती, आनंद, संपत्ती, दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य आणते असे मानले जाते. औषधी गुण तत्त्वांमुळे त्याला ‘अमृत’ म्हणतात. आपल्या यजुर्वेदामध्ये सुद्धा जल हे सर्व रोगांवरचे औषध दिले आहे.


"शुद्धा न आपस्तन्वे क्षरन्तु’।
म्हणजे जलाची शुद्धता ही आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहे. पुराणानुसार पूजेचे साहित्य नद्यांमध्ये विसर्जन करणे, अस्थी विसर्जन करणे, पाण्यात थुंकणे, मूत्रविसर्जित करणे... हे सर्व जलाचा अपमान आणि पाप करण्यामध्ये येते. वैदिक परंपरेनुसार जलसंवर्धन करणे फार आवश्यक आहे. जल हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. परमेश्वराने या सजीव सृष्टीसाठी पालक म्हणून परिपूर्ण व्यवस्था केली आहे. पंचतत्त्वांव्यतिरिक्त वृक्ष-वनसंपत्ती सर्व काही दिले आहे. या अद्भुत शक्तीने आपल्यासाठी हे अमृतमय जल स्रोत नद्या, सागर, तलाव, झरे यातून सर्व घटकांपर्यंत पोहोचवले आहे. ऋतुचक्र योग्यरीत्या चालते, तेथून आपल्याला जल हे पावसाच्या माध्यमातून मिळते.


युगानुयुगे मानवाच्या प्रवृत्तीत जसजसा बदल होत गेला तसतसे पर्यावरण कमकुवत होत चालले. सांडपाणी, औद्योगिक कचरा, शेतीतील रसायने, प्लास्टिक, तेल गळती अशी जलप्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. मूळ औद्योगिक क्रांतीमुळे आपण जल विषमय करत आहोत. जल प्रदूषण अनेक कारणांमुळे होते, ज्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक समाविष्ट आहेत.


जगात १,५०,००० पेक्षा जास्त नद्या आहेत. नाईल, ॲमेझॉन, मिसिसिपी, यांगत्झी सारख्या प्रमुख नद्या आहेत. भारतात जवळजवळ ४०० पेक्षा अधिक नद्या होत्या त्यातील प्रमुख १२ नद्या आहेत. यातील ब्रह्मपुत्र, गंगा, नर्मदा, सरस्वती, इंडस, ओहायो, मेघना, युना अशा अनेक नद्या आता आटल्या आहेत. या नद्या आटण्याचे मुख्य कारण म्हणजे धरणे आणि अनेक पर्यावरण हानिपूरक योजना. महाराष्ट्रातील ५५ नद्या या सर्वाधिक प्रदूषित असून भारतातील दिल्ली जवळील यमुना, पाकिस्तानातील रावी आणि इतर देशातील नैरोबी, थेम्स, पाझ, नायजर आणि नाईल, येलो, आर्टेमिस, अशा अनेक नद्या आहेत. प्रशांत, अटलांटिक, दक्षिणी, आर्कटिक, हिंद हे प्रमुख पाच महासागर आहेत. शिवाय अजून पन्नास समुद्र सुद्धा आहेत. आपण समुद्र सुद्धा प्रदूषित करत आहोत. प्लास्टिक, औद्योगिक नद्यांमधील कचरा समुद्रात सोडून दिल्यामुळे समुद्राच्या गुणवत्तेला नुकसान झाले आहे.


ज्याचा परिणाम मानवी आणि जलचर आरोग्यावर होत आहे. जगामध्ये कचरा आणि सांडपाणी यामुळे सर्व नद्यातील परिसंस्थेचा नाश झाला आहे. नद्या, समुद्र या सर्वाचे जल हे प्रदूषित झाल्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या खालचे पात्र हे मृत झाले आहे म्हणजेच ऑक्सिजनची पातळी ही २० टक्क्यानी कमी झाली आहे. औद्योगिक क्रियाकलापांमुळे येथील जीव जीवाणूंसाठी असणारे पोषक घटक तत्त्व (सशक्त गाळ) विषारी झाल्यामुळे येथील जीवसृष्टी नामशेष होत चालली आहे. समुद्रातील ध्वनी उदाहरणार्थ तेल ड्रिलिंग, समुद्री परिवहन, समुद्रावर टाकण्यात येणारी प्रकाश योजना ज्यामुळे प्राकृतिक घटकांना त्यांच्या जीवनचर्येत बाधा उत्पन्न करत असून उष्णता वाढल्यामुळे येथील समुद्री जीवांना गंभीर नुकसान होत आहे. या जलप्रदूषणामुळे आमांश, अतिसार हेपेटाइटिस ए, कॉलरा, टायफॉइड, पोलिओ, प्रजनन संस्थेवर परिणाम, कर्करोग आणि घातक रासायनिक द्रव्यांमुळे शरीरातील इतर अवयवांवर होणारे परिणाम अशा अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


आता जगभरात साधारणत: २५% लोकसंख्येला सुद्धा पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर करावा लागतो पण महत्त्वाचे म्हणजे क्लोरीनमुळे जंतू मरतच नाही. WHO नुसार जगभरात कमीत कमी दोन अब्ज लोक हे प्रदूषित जल पितात, तर दिवसातून फक्त अतिसारामुळेच अंदाजे १००० मुलांचा तरी मृत्यू होतो. माझ्या मते या सजीव सृष्टीतील अनेक घटक या प्रदूषणामुळे नामशेष झाले आहेत, ज्याची आपण मोजणी करू शकतच नाही आणि मानवाची सुद्धा. १९७४ मध्ये "वॉटर ॲक्ट" स्थापित केला होता त्यानुसार अनेक मंडळांची स्थापना करून कडक कायदे जलप्रदूषण करणाऱ्यांवर आणि जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण यावर केले गेले. १९८८ मध्ये पर्यावरण संरक्षणासाठी यात अजून सुधारणा करण्यात आली. प्रदूषणामुळे सुरुवात तर ऋतुचक्र बदलाने झालीच आहे, पण भवितव्यात सजीव सृष्टीसाठी असणाऱ्या गरजाचं काय? बदलणारा निसर्ग आपल्याला सारखा सावध करतोय.


भविष्यात सांगितल्याप्रमाणे तिसरे महायुद्ध झाल्यानंतर सुरुवात ही जल संकटाने होणार आहे. ऋतुचक्र-वनस्पती ते सर्व सजीव, निर्जीव घटक या सर्वांसाठी जल ही संजीवनी आहे; परंतु मानवाने त्याच्या क्रूर आणि घातकीपणामुळे या जलदेवतेला विषमय करून टाकले आणि ही संजीवनी मृत्यून्त झाली. चारही बाजूंनी समुद्राने घेरलेल्या मुंबईसारख्या बेटाला सुद्धा या जल प्रदूषणाचा फटका जोरदार बसणार आहे. कारण आपण पराकोटीचे प्रदूषण करत आहोतच; परंतु समुद्राला आत ढकलण्याचा जो काही विडा उचलला आहे त्यात एक दिवस हा समुद्र या बेटाला गिळंकृत करेल. निसर्गातील प्रत्येक घटक हा विचारपूर्वक आणि संतुलित केला गेला आहे. त्यात ढवळाढवळ केल्यास प्रकृती कधीही सहन करणार नाही. या मानवी क्रुरकर्मामुळे या सजीव सृष्टीतील एकही घटक जिवंत राहू शकणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी अमृतमय जल विषमय होऊन जाईल आणि विष सुद्धा प्यायला मिळणार नाही !


आता तरी या परिपूर्ण मानव घटकाने तिच्या संरक्षणात्मक कार्य करावे म्हणजे जलसंतुलन होऊ शकते आणि तरच ही जलदेवता तुम्हाला म्हणजे सर्व सजीव सृष्टीला कायम सुखमय आणि आनंदमय ठेवू शकते.


[email protected]

Comments
Add Comment