बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार खेळाडू विराट कोहली विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. त्याच प्रकरणाच्या चौकशीत वेंकटेश यांची तक्रार समाविष्ट केली जाईल.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आज, शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूचे (आरसीबी) मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे याच्यासह अन्य तिघांना अटक केली. ते इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए नेटवर्क्सशी संबंधित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए)चे सचिव शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांच्याही घरी पोलिसांनी धडक दिली. मात्र ते घरी नव्हते.
निखिल सोसाळे हे विमानाने मुंबईला जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बंगळूरु विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरू आहे. डीएनएचे इतर 3 कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात आणले, जिथे त्यांची चौकशी सुरू आहे. चेंगराचेंगरीत निष्काळजीपणाचे कारण, नियम, कार्यक्रमाची परवानगी आणि सुरक्षा मानकांशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष याबाबत पोलीस तपास करत आहेत.






