नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे अश्विनी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असला तरी त्यांचा संघर्ष आजही संपलेला नाही. अश्विनी यांच्या मृत्यू दाखल्यासाठी पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला.
अश्विनी यांचा मृतदेह सापडला नाही किंवा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नाही, अशी कारणे देऊन पोलिसांनी मृत्यू दाखला देण्यास टाळाटाळ चालवली आहे. ही टाळाटाळ नऊ वर्षांनंतरही सुरू आहे. अश्विनी यांची हत्या झाल्याचे मान्य करत न्यायालयाने आरोपींना शिक्षाही ठोठावली. पण पोलिसांनी अद्याप अश्विनी यांचा मृत्यू दाखला दिलेला नाही.
अश्विनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिल्लक अर्जित रजेचा पगार, उपदान, बीसीपीआय फंडाची रक्कम आदी लाभ वारसांना मिळण्यासाठी मृत्यूचा दाखला आवश्यक आहे. आम्हाला न्याय मिळाला, पण मृत्यूचा दाखला अद्याप मिळालेला नाही, असे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले.
सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्येप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर, अश्विनी बिद्रे यांच्या तुकडे केलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, या दोन्ही आरोपींनी सात वर्षांची शिक्षा भोगलेली असल्याने या दोघांची सुटका झाली.
बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची निर्घृणपणे हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत टाकून दिल्याचे साक्षीपुराव्यावरून सिद्ध झाले आहे. तसेच, कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांनी अश्विनीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केल्याचे समोर आले.






