Monday, May 12, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

कुडाळात गळफास घेऊन पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

कुडाळात गळफास घेऊन पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

सिंधुदुर्ग :  कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (३१, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दुपारी पावणेचार पूर्वीची हि घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटेच राहत होते. आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईल वर त्यांनी 'तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे' अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॅच लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


सुरज यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सूरज हे मळगाव-कुम्भार्लीवाडी येथील मूळ रहिवाशी होते. त्यांच्या त्या घरी आई, भाऊ, वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे. तर, त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. सुरज पवार यांच्या या जाण्याने कुडाळ पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यानी हळहळ व्यक्त केली. पोलीस उप विभागीय अधिकारी कांबळे यांनी सुद्धा याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तातडीने भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास पीएसआय माने करत आहेत.

Comments
Add Comment