Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Ashish Shelar : दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

Ashish Shelar : दोन महिन्यात राज्याचे नाट्यगृहधोरण आणणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

वर्धा : महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना व प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे राज्यातील सर्व नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नगर परिषद देवळीच्या वतीने बांधण्यात आलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण व विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्राची १८२३ पासुनची कलासंस्कृतीची परंपरा असून या कला संस्कृतीचे जतन जपणूक करणे महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासन रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी महिलासाठी विविध कल्याणकारी योजनांसोबतच राज्यातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आर्थिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आशिष शेलार म्हणाले. या नाट्यगहृातून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होऊन नगर पालिकेला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल अशा आशावाद त्यांनी यावेळी केला. शासकीय विविध कार्यक्रमासाठी या नाट्यगृहाचा वापर व्हावा यासाठी अशा सुचनाही यावेळी आशिष शेलार यांनी दिल्या.

सांस्कृतिक कार्य मंत्री झाल्यानंतर नाट्यगृहाचे हे पहिलेच लोकार्पण असल्याचे सांगून आशिष शेलार म्हणाले की, देवळी येथील नाट्यगृह अतिशय देखणे आहे. या नाट्यगृहात राज्य व देशपातळीवर नाव लौकिक करणारे कलावंत निर्माण होतील, असेही आशिष शेलार म्हणाले. जिल्ह्यातील देवळी ही क वर्ग दर्जाची नगर पालिका असतांना सुध्दा ईनडोअर स्टेडीअम, अत्याधुनिक नाट्यगृहाची निर्मिती सोबतच विविध विकास कामे नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. ही देवळी नगर परिषेदेसाठी भुषणावह बाब आहे. देवळीच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने निधीची कमी पडू देणार नाही, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

देवळी हे महामार्गाला जोडलेले शहर असल्यामुळे येथे दळणवळणाच्या पर्याप्त प्रमाणात सुविधा उपलब्ध असून येथील रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. राजेश बकाने म्हणाले. देवळी मतदार संघांतर्गत येणा-या वर्धा तालुक्यातील सेवाग्राम येथे सांस्कृतिक भवन व पत्रकार भवनाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी योवळी केली. हिंगणघाट येथे सांस्कृतिक भवनासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून जागेअभावी सांस्कृतिकभवनाचा प्रस्ताव तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याने यावर शासनस्तरावर प्रयत्न करावा, असे आ. समिर कुणावार म्हणाले.

देवळी येथे चांगले खेळाडू व कलाकार निर्माण होण्यासाठी स्टेडीअम सोबतच नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली असून येथील कलागुणांना वाव मिळेल. आर्वी येथील सांस्कृतिक भवन करीता निधी मंजूर झाला असून जागेच्या प्रशासकीय कामाच्या अडचणीमुळे प्रस्ताव प्रलंबित असल्याची खंत यावेळी आ. दादाराव केचे यांनी व्यक्त केली. या नाटयगृहामुळे येथील कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबत व्यावसायिक दृष्टया नगर पालिकेला एक उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. देवळीमध्ये खेळाडूसाठी इडोअर स्टेडीअमची निर्मिती करण्यात आली असून खेळाडूंच्या निवासासाठी वसतिगृह बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा यावेळी रामदास तडस यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान अंतर्गत सन २०१५-१६ वर्षात मंजूर झालेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह लोकार्पण व ८ कोटी ५० लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. ६०० आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहाचे बांधकाम १२ कोटी रुपये खर्च करून करण्यात आले आहे. यावेळी मंत्री महोदयाचे हस्ते नाट्य चळवळीत योगदान देणा-या, कलाकार, साहित्यकारांचा तसेच भजनी मंडळींना टाळचे वितरण करण्यता आले.

Comments
Add Comment