Monday, June 8, 2026

Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीचे संकट, महापालिकेने दिली माहिती

Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीचे संकट, महापालिकेने दिली माहिती

पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत आहे. अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे मनपाने शहरात पुढील आठवड्यापासून पाणीकपात लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपाने केले आहे. पुढील आठवड्यात सोमवारपासून संपूर्ण पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही माहिती दिली. जोपर्यंत पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा होत नाही तोपर्यंत ही पाणीकपात सुरू राहणार आहे. आवश्यकता भासल्यास पाणीकपात आणखी तीव्र केली जाण्याचीही शक्यता आहे.

पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरण समूहातून पाणीपुरवठा होतो. यंदा अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. हवामान विभागाने सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शिवाय पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याची पातळी घटत आहे. यामुळे पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे मनपाच्या पाणी विभागाने घेतला आहे.

मनपाच्या आकडेवारीनुसार पुणे शहरासाठी दरमहा सुमारे १.६ टीएमसी पाणी लागते.सध्याची परिस्थिती पाहता खडकवासला धरण समूहातून होणारा हा पाणीपुरवठा सुरू ठेवणे कठीण असल्यामुळे पुणे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुढील आठवड्यापासून हा एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय अमलात आणला जाईल. पाणीकपातीचे अंतिम वेळापत्रक जलसंपदा विभागाशी चर्चा करून लवकरच जाहीर केले जाणार आहे. निर्णय काहीही झाला तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी जपून वापरावे, असे आवाहन पुणे मनपा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >