Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६,८१४ वाहनांची नोंदणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६,८१४ वाहनांची नोंदणी

मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी


मुंबई : राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चार चाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.

Comments
Add Comment