मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ४२ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांना यंदा जुलै अखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. या तलावांमधून ठाणे, भिवंडी शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा करूनही तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुंबईकरांना १३० ते १३५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे.
Ratnagiri Water Supply : रत्नागिरीत एप्रिलपासून दर सोमवारी होणार पाणीपुरवठा बंद!
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुमारे ५७ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २०२४ मध्ये २४ मार्चपर्यंत पाणीसाठा ३७ टक्के होता. यंदा ४२ टक्केपेक्षा जास्त आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ४२.१३ टक्के म्हणजे ३ लाख २ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर व तानसा तला वगळता अन्य तलावातील पाणीसाठाही ४६ ते ५५ टक्के इतका आहे.
सातही तलावाचा आढावा घेतला असता या तलावामध्ये सुमारे ६ लाख १६ हजार ५४६ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला रोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पाहता, हा साठा १५६ दिवस पुरेल इतका आहे. पण या तलावातील काही पाणी ठाणे व भिवंडीसह काही गावांना दिले जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला १२० ते १२५ दिवस पाणी येणार आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.