Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘सुप्रिम’ची नाराजी

Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘सुप्रिम’ची नाराजी

असंवेदनशील व अमानवी, बलात्कारासंबंधी निकाल


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका वादग्रस्त निकालावर स्थगिती दिली आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने १७ मार्च रोजी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने संज्ञान घेत सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालावर स्थगिती दिली आहे.


एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निकाल वादग्रस्त ठरला होता. पीडितेच्या स्तनांना स्पर्श करणे, तिच्या पायजम्याची नाडी सोडणे आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा नाहीत, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘अलाहाबाद उच्च न्यायालयाचा हा निकाल पूर्णपणे असंवेदनशील व अमानवी दृष्टीकोन दर्शवतो’.



सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की आम्हाला याप्रकरणी निकाल देताना आणि उच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा असल्याचं सांगताना खेद वाटतो की त्यांच्या काही टिप्पण्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर कठोरपणे असहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले, “उच्च न्यायालयाचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक होता.”



१४ वर्षे जुने होते प्रकरण


उत्तर प्रदेशच्या कासगंज येथे २०११ मध्ये हा गुन्हा घडला होता. दोन आरोपींनी एका ११ वर्षीय मुलीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही आरोपींनी तिच्या छातीला स्पर्श केला, तिच्या पायजम्याची नाडी सोडली, तसेच तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पादचाऱ्यांनी या दोघांना हटकल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला होता.

Comments
Add Comment