Friday, April 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबलुचींचा आक्रोश

बलुचींचा आक्रोश

अभय गोखले

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी बोलान परिसरात क्वेट्ट्याहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करून पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराला आव्हान दिले आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात क्वेट्टा रेल्वे स्टेशनवर बलुची बंडखोरांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २६ जणांचा मृत्यू झाला होता. अर्थात अशाप्रकारे रेल्वेगाडीचे अपहरण करून आपल्या मागण्यांकडे पाकिस्तानी सरकारचे लक्ष वेधण्याचा बलुची बंडखोरांचा हा प्रयोग अनोखा आहे. बंडखोरांनी बोगदा नंबर आठमध्ये जाफर एक्स्प्रेसच्या इंजिनावर रॉकेट लाँचर्सच्या सहाय्याने हल्ला करून गाडीच्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि गाडीतील प्रवाशांना ओलीस ठेवले. या गाडीतून सामान्य प्रवाशांबरोबरच पाकिस्तानी सुरक्षादलाचे सैनिकही प्रवास करत होते. बंडखोरांनी महिला, लहान मुले आणि बलुची नागरिकांची सूटका केली आणि इतरांना ओलीस ठेवले. त्यांची सूटका करण्याच्या बदल्यात बंडखोरांनी काही मागण्या पाकिस्तानी प्रशासनाकडे केल्या. ज्या बंडखोरांना पाकिस्तानी सरकारने तुरुंगात टाकले आहे, त्यांची सूटका करणे, ज्या नागरिकांचे वेळोवेळी पाकिस्तानी सुरक्षादलांकडून अपहरण करण्यात आले आहे, त्यांची सूटका करणे, अशा प्रकारच्या मागण्या बंडखोरांकडून करण्यात आल्या. ज्या ठिकाणी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करण्यात आले तो प्रदेश अतिशय दुर्गम आहे. तो प्रदेश पर्वत रांगांनी वेढलेला असल्यामुळे तेथे रस्ते नाहीत. त्या प्रदेशात बोगदे खणून रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहे. क्वेट्टा येथून पेशावर येथे जाण्यासाठी हा रेल्वे मार्ग दळणवळणाचे एकमेव साधन आहे. त्यामुळेच बलुच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करण्यासाठी हे ठिकाण निवडले असावे.

ओलिसांची सूटका करण्याचे मोठे आव्हान पाकिस्तानी सुरक्षा दलांसमोर होते. हा प्रदेश दुर्गम असल्यामुळे आणि बंडखोर हे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असल्याने, पाकिस्तानी सुरक्षा दलांसमोर मोठेच आव्हान उभे होते. शरीराला स्फोटके बांधलेल्या बंडखोरांच्या आत्मघातकी पथकाने ओलीस ठेवलेल्या प्रवाशांचे गट बनवून त्यांचा ढाली सारखा वापर केल्याने, ओलिसांची सूटका करणे कठीण होते. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सुरक्षादल आणि बंडखोर यांच्यात झालेल्या चकमकीत अखेर बंडखोरांना पराभव पत्करावा लागला. या धुमश्चक्रीत ३३ बंडखोर मारले गेले. पाकिस्तानी सुरक्षा दलाचे चार जवान मारले गेल्याची माहिती, तसेच ओलीस ठेवलेल्यांपैकी २१ जणांना बंडखोरांनी ठार मारल्याची माहिती पाकिस्तानी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने अशाप्रकारे ओलीस ठेवलेल्या प्रवाशांची सूटका करण्यात यश मिळविले असले तरी बलुची बंडखोरांच्या वाढत्या कारवाया हा पाकिस्तानी प्रशासनाकरता अतिशय चिंतेचा विषय होऊन बसला आहे.

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी ४७ टक्के भूभाग हा बलुचिस्तानमध्ये आहे. मात्र बलुचिस्तानची लोकसंख्या, पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ५ टक्के आहे. हा विभाग निरनिराळ्या खनिजांनी समृद्ध असा आहे. उर्वरित पाकिस्तानला घरगुती गॅसचा पुरवठा बलुचिस्तानमधून केला जातो. इतर खनिजेही बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने, पाकिस्तानला त्यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो; परंतु त्यापैकी अतिशय कमी वाटा बलुचिस्तानवर खर्च केला जातो, अशी बलुचींची कायमची तक्रार आहे. या बाबतीत पंजाबला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप बलुचींकडून नेहमीच केला जातो. सरकारी नोकऱ्या आणि पाकिस्तानी लष्करात बलुचींचे प्रमाण अत्यल्प आहे. चीनकडून ग्वादार बंदराचा विकास केला जात आहे, तिथेही बिगर बलुची कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या संयुक्त प्रकल्पातही बलुचिस्तानचे कोणतेही हीत साधण्यात आलेले नाही. एकंदरीत पाकिस्तानच्या वाढत्या दडपशाहीला कंटाळलेली बलुचिस्तानची जनता पाकिस्तानपासून वेगळी होऊ पहात आहे. गेली अनेक वर्षे बलुचिस्तानची जनता पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी पोलीस यांचे अत्याचार सहन करत आहे.निरपराध नागरिकांचे अपहरण करणे, त्यांचा छळ करणे अशा प्रकारच्या घटना बलुचिस्तानमध्ये रोजच्या रोज घडत आहेत. बलुचीस्तानमधील निरनिराळ्या संघटनांनी एकत्र येऊन बलुचिस्तान नॅशनल आर्मी नावाच्या एका संघटनेची नुकतीच स्थापना केली असून, पाकिस्तानी प्रशासनाच्या दडपशाही विरोधातील आपला लढा आणखी तीव्र करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. जाफर एक्स्प्रेसवरील बंडखोरांचा हल्ला हा त्याचाच एक भाग असू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -