Friday, May 9, 2025

कोकणताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरत्नागिरी

Nilesh Rane : राजापुरात नाहक वातावरण भडकावू नका

Nilesh Rane : राजापुरात नाहक वातावरण भडकावू नका

आ. निलेश राणे यांनी तथाकथित सोशल मीडियावाल्यांना सुनावले


रत्नागिरी : कोकणात सगळेच सण, उत्सव शांततेत साजरे होतात. राजापुरातील स्थिती आटोक्यात आली असून आम्ही असेपर्यंत कोकण पेटायला देणार नाही, कोकण हे शांत आहे आणि शांतच राहणार, असे सांगत काही स्वयंघोषित सोशल मीडिया हँडल्सनी वातावरण बिघडवू नये असे माजी खासदार व कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी सुनावले. बुधवारी रात्री राजापूर येथे धोपेश्वर देवस्थानची पारंपरिक होळी जात असताना होळीच्या मार्गावर एके ठिकाणी दोन गटांत वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी यावर वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणातही आणली. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणांहून याबाबत गैरसमज पसरवणारे, चुकीचे चित्र रंगवणारे पोस्ट व्हीडिअो व्हायरल झाले होते.



यात कोकण पेटले आहे, असे दाखवण्यात येत होते. या सगळ्या गोष्टीचा समाचार आमदार निलेश राणे यांनी घेतला. याबाबतचा व्हीडिओ त्यांनी त्यांच्या एक्स हँडल वरून प्रसारित केला. त्यात आमदार निलेश राणे म्हणाले, राजापूर तालुक्यातील धोपेश्वर येथील होळी ही तालुक्यातील सर्वात मोठी होळी आहे. ही होळी नेण्याचा अनेक वर्षांपासून एकच आणि पूर्वापार मार्ग ठरलेला आहे. या मार्गावरून जाताना होळी एका विशिष्ट ठिकाणी थांबते. यावर्षी त्या मार्गावर जात असताना या विशिष्ट ठिकाणी जिथे होळी थांबते, तिथे थांबली पण गेट बंद होते. त्यानंतर वातावरण बिघडले आणि घोषणा देण्यात आल्या. दोन्ही बाजूने बाचाबाची झाली. याचवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर आता हा विषय पोलीस स्थानकापर्यंत गेला असून पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यावर मार्ग काढत आहेत. मात्र काही तथाकथित पत्रकार आणि सोशल मीडियातल्या काही हँडल्सनी, काही नेत्यांनी त्यांच्या हँडल्सवरून या धोपेश्वरच्या होळीतील वादावर कोकण पेटले आहे असे चित्र दाखवायला सुरुवात केली. धोपेश्वर होळी दरम्यान घडलेल्या घटनेतील ठरावीकच भागच यावेळी दाखवण्यात येत होता, असे आमदार निलेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment