Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदक्ष कन्येपासून सृष्टी निर्मिती

दक्ष कन्येपासून सृष्टी निर्मिती

भालचंद्र ठोंबरे

पुराणनुसार ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून दक्षाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. काही पुराणानूसार दक्षाला पहिल्या जन्मात प्रसूती व कल्पातरांनंतरच्या दुसऱ्या जन्मात असिक्नी अशा दोन पत्नी होत्या. प्रसुतीपासून दक्षाला २४ कन्या झाल्या, तर असिक्नीपासून ६० कन्या झाल्या. दक्षाच्या कन्या, देव, देवता, असुर, राक्षस, ऋषी आदि सर्वांना दिल्या होत्या.त्यामुळे ‌प्रजापती दक्ष हा खऱ्या अर्थाने सृष्टी वाढविणारा प्रजापती होता. दक्ष विष्णूचे परमभक्त होते. सध्याच्या उत्तराखंड परिसरात दक्षाची सत्ता होती. दक्षाला प्रसुतीपासून झालेल्या श्रद्धा, लक्ष्मी, ध्रुती, तृष्टी, पुष्टी, मेघा, क्रिस्त, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, सिद्धी, कीर्ती, ख्याती, सती, सम्भूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नती, अनुसया, ऊर्जा, स्वाहा व स्वधा या २४ कन्यांपैकी पहिल्या १३ कन्या धर्माला, तर भृगुला ख्याती, महादेवाला सती, मरीचीला समृद्धी, अंगीरसाला स्मृती, पुलस्यला प्रीती, पुलहला क्षमा, कृशाश्वला सन्नती, अत्रिला अनुसया,वशिष्ठला ऊर्जा, अग्नीला स्वाहा, व पितृला स्वधा अशा दिल्या.

दक्षाला असिक्नीपासून अदिती, दिती, दनू, काष्टा, अरिष्टा, सुरसा, ईला, मुनी, क्रोधवषा, सुरभी, सुरमा, ताम्रा, तिमी, विनता, कद्रू, यामिनी, पतंगी, मरूवती, लंबा, अरुंधती, भानू, संकल्प, मुहूर्त, विश्वा, जामी, वसु, संध्या, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पूनर्वसु, पूष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, स्वरूपा, भूता, अर्ची, दिशाना, स्मृती, रती अशा एकंदर ६० मुली झाल्या. दक्षाला असिक्नीपासून झालेल्या ६० कन्यांपैकी कश्यप ऋषीला (पहिल्या) १७, धर्माला (पुढच्या)१०, चंद्राला २७, भुताला २ (स्वरुपात भुता), कृशाश्वाला २(अर्ची, दिशाना), व अंगीराला स्मृती व कामदेवाला रती अशा दिल्या होत्या. चंद्राला दिलेल्या २७ कन्या या २७ नक्षत्र आहेत. यापैकी रोहिणीवरच चंद्राचे जास्त प्रेम असल्याची तक्रार अन्य कन्यांनी प्रजापिता दक्षाकडे केली असता दक्षाने चंद्राला क्षय होण्याचा शाप दिला. त्यामुळे सर्वत्र अंध:कार पसरला.

अखेर चंद्राने दक्षाची क्षमा मागितली, असता एका पंधरवड्यात चंद्राचा क्षय होत जाईल, तर दुसऱ्या पंधरवड्यात चंद्राला हळूहळू पून्हा तेज प्राप्त होईल असा उ:शाप दिला. दक्षाच्या कन्यांमुळेच सृष्टीवर वंश बहरले. त्यातही कश्यपाला दिलेल्या १७ कन्यांमुळे सृष्टीत खूप वाढ झाली. त्यामुळे या कन्यांना लोकमाता म्हणूनही मान्यता मिळाली आहे. कश्यप ऋषी हे ब्रम्हाच्या मानसपुत्र मरीचीचे पुत्र असून काश्मीर ही त्यांची तपोभूमी मानली जाते. त्यांचा आश्रम मेरू पर्वतावर असून भारतात त्यांचे विविध ठिकाणी आश्रम आहेत. ते सप्त ऋषिपैंकी एक प्रमुख ऋषी मानले जातात. कश्यप व त्यांचा वंश :
कश्यपाला अदिती, दिती, दनू, काष्टा, अरिष्टा, सुरसा, ईला, मुनी, क्रोधवषा, सुरभी, सरमा, ताम्रा, तिमी, विनता, कद्रू, यामीनी, पतंगी अशा १७ पत्नी होत्या.
१) अदिती – अदितीपासून देवाची निर्मिती झाली असून विवस्वान, अर्यमा, पूजा, त्वष्टा, सविता, भग धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र, त्रिविक्रम अशी त्यांची नावे आहेत. यांनाच १२ आदित्य असेही म्हणतात.
२) दिती – पासून दैत्य निर्माण झाले. त्यात हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू व मुलगी सिंहिका, तसेच ४९ मरुदगण आहेत. मरुद्गणांना संतती नाही.
३) दनू – दनूपासून झालेल्या मुलांना दानव म्हणतात. हे ६१ असून मुख्य ४० आहेत. यापैकी वैश्वानरच्या उपदानवी, हयशीरा, पूलोमा व कालिका या कन्यांपैकी पुलोमा व कालिका यांच्याशी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून कश्यपाने विवाह केला व त्यांच्याद्वारे पौलोम व कालकेय मिळून एकंदर साठ हजार दानव निर्माण झाले. पुढे हे निवातकवच नावाने प्रसिद्ध झाले. ते यज्ञामध्ये विध्वंस करीत त्यामुळे अर्जुनाने आपल्या स्वर्ग भेटीमध्ये त्यांना ठार केले.
४) काष्टा – काष्टापासून एक खुरवाले जनावर घोडा वगैरे यांची निर्मिती झाली.
५) अरिष्ठा – गंधर्व व यक्ष निर्माण झाले.
६) सूरसा – राक्षस तयार झाले. जसे सहेती, प्रहेती. यांच्याच वंशात रावणाचा जन्म झाला.
७) ईला – वृक्ष, लता आदी वनस्पती निर्माण झाल्या.
८) मुनी – अप्सराची निर्मिती झाली.
९) क्रोधवष – सरपटणारे विषारी जंतू
१०) सुरभी – गाय, बैल, म्हैस, रेडे व अन्य दोन खुरवाले पशू निर्माण झाले.
११) सरमा – वाघ, सिंह वगैरे सारखे हिंस्त्र जनावरे.
१२) ताम्रा – उडणारे, शिकारी पक्षी, जसे की गिद्ध, ससाणा झाले.
१३) तिमी – जलचर, जंतू वगैरे निर्माण झाले.
१४) विनता – गरुड व अरुण (सूर्याचा सारथी.)
१५) कद्रू – १००० नाग ज्यात अनंत(शेषनाग विष्णूची शय्या), वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिक आदि प्रमुख आहेत.
१६) यामीनी – टोळसारखे पक्षी
१७) पतंगी – कीटक निर्माण झाले.
अशाप्रकारे सृष्टीचा विस्तार झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -