Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीमहावितरणच्या ५१ हजार वीज ग्राहकांची बत्ती गुल

महावितरणच्या ५१ हजार वीज ग्राहकांची बत्ती गुल

पाच जिल्ह्यांमध्ये ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी

पुणे : पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू असून गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. यासोबतच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरु आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

Fake Paneer : पनीर खाताय… सावधान! भेसळयुक्त १४०० किलो पनीर जप्त

पुणे प्रादेशिक विभागात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सद्यस्थितीत पुणे जिल्हा-१९९ कोटी ९९ लाख रुपये, सातारा-२० कोटी ४० लाख रुपये, सोलापूर-४४ कोटी ७ लाख रुपये, कोल्हापूर-२० कोटी ८० लाख रुपये आणि सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई

थकीत वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी,कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते राजेंद्र पवार (पुणे),स्वप्निल काटकर (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (बारामती) उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.वीजबिल थकीत असेल तर नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वेबसाईटवर तसेच मोबाईल अॅपद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा

वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा-४२ हजार ७३,सातारा-१ हजार ९२०, सोलापूर- ४ हजार २७९, कोल्हापूर-१ हजार ४९० आणि सांगली जिल्ह्यातील १ हजार ९७३ थकबाकीदारांचा समावेश आहे. वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -