मुंबई: विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान(नाबाद १००) आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया(८४) विरुद्ध खेळी केली. यानंतर जेव्हा धावांचा पाठलाग करण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यापेक्षा मोठा खेळाडू नाही.
आता कोहलीची नजर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर आहे. हा सामना ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध रंगणाऱ्या या सामन्यात विराट कोहलीकडे वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडण्याची संंधी आहे. कोहलीने धावांचा पाठलाग करताना ८ हजाराहून अधिक धावांचा आकडा पार केला आहे.
क्रिस गेलचा रेकॉर्ड तुटणार…
विराट कोहलीच्या नावावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये १७ सामन्यांमध्ये ७४६ धावा आहेत. एखाद्या भारतीय फलंदाजाच्या या सर्वाधिक धावा आहेत. ओव्हरऑल त्याच्यापुढे केवळ क्रिस गेल आहे. त्याने १७ सामन्यांत ७९१ धावा केल्या आहेत. म्हणजेच कोहलीने फायनलच्या सामन्यात ४६ धावा केल्या तर तो क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडू शकतो. तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे. त्याच्या नावावर २२ सामन्यांत ७४२ धावा आहेत.
९ मार्चला फायनल सामना
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधील फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्चला रंगणार आहे. दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रतिस्पर्ध्यांना हरवत फायनल गाठली. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवले.