कामगार मंत्री ॲड आकाश पांडुरंग फुंडकर
मुंबई : राज्यात कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचे दुर्दैवी मृत्यू होतात. तसेच अशा घटनांमध्ये काही कामगार जखमी होतात. अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी जाऊन याप्रकरणी तपासणी करतात. तपासणीअंती अहवाल सादर करतात. जास्तीत जास्त कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. अशा दुर्घटनांमध्ये कामगाराच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर (Pandurang Fundkar) यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य राजू तोडसाम, नाना पटोले, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला.
एसटीच्या आवारातील जाहिरातीच्या जागा परस्पर ताब्यात घेण्याचा प्रयत्न
लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची ७० लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदनाची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल.सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.