राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर विविध नाटकांचे महोत्सवी प्रयोग रंगत असतात. पण सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाच्या ५०व्या प्रयोगाच्या निमित्ताने, या नाटकाची निर्मितीसंस्था ‘रसिक मोहिनी’तर्फे अनपेक्षित अशी एक घोषणा करण्यात आली आणि ती लक्षवेधी ठरली. ही घोषणा म्हणजे या नाटकाच्या ‘नाम’बदलाची…! आता ५० प्रयोग झाल्यानंतर ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचे शीर्षक बदलण्यात येत असून, या नाटकाला आता ‘तू भेटशी नव्याने’ असे शीर्षक देण्यात येत आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या नवीन शीर्षकासह हे नाटक १ मार्चपासून रंगभूमीवर रंगणार आहे. आता या नाटकाचे शीर्षक बदलत असले, तरी या ‘अल्बम’मधले फोटो मात्र तेच राहणार आहेत. याचा अर्थ असा की, नाटकाचे शीर्षक नवीन, पण नाटक मात्र आहे तेच राहणार आहे. पण कळीचा मुद्दा असा की, ५० प्रयोग झाल्यानंतर या निर्मितीसंस्थेला नाटकाचे शीर्षक बदलावेसे का वाटले असेल…? हा प्रश्न रसिकांच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अर्थात तसेच काहीसे कारण असल्याशिवाय असा निर्णय घेतला गेला नसणार, हेही ओघाने आलेच.
या बदलाबाबत या नाटकाच्या निर्मात्या भाग्यश्री देसाई यांच्याशी संवाद साधला असता या ‘नाम’बदलाचे उत्तर मिळते. भाग्यश्री देसाई म्हणतात, साधारण वर्षभरापूर्वी ‘रसिकमोहिनी’ व ‘एफएफटीजी’ निर्मित, राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘अमेरिकन अल्बम’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले. त्याचे पुणे, मुंबईसह सोलापूर, कोल्हापूर, जयसिंगपूर, इस्लामपूर, इचलकरंजी, सांगोला, नाशिक अशा अनेक ठिकाणी प्रयोग झाले आणि आजही होत आहेत. नाटकाला अनेक नामांकने आणि पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत. नाटकाच्या सुरुवातीपासूनच काही जणांना याचे इंग्रजी नाव बदलून मराठी नाव ठेवावे असे वाटत होते. पण लेखक, दिग्दर्शकांसह आमच्या सहनिर्मात्यांनाही त्याची आवश्यकता वाटली नव्हती. मात्र आता ‘अमेरिकन अल्बम’च्या ५० व्या प्रयोगानंतर आम्ही त्याचे नाव बदलून ‘तू भेटशी नव्याने’ या नावाने हेच नाटक प्रेक्षकांसमोर पुन्हा घेऊन येत आहोत. याला कारणही तसेच आहे. या नाटकाचे प्रयोग होत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली आणि ती अशी की नाटकाच्या नावातल्या ‘अल्बम’ या शब्दामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये गोंधळ होत आहे. काहींना तो गाण्यांचा कार्यक्रम वाटतो, तर काहींना तो ऑर्केस्ट्रा वाटतो. तसे आम्हाला फोनही आले.
हा सगळा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही नाटकाच्या जाहिरातीत ‘भावस्पर्शी मराठी नाटक’ असेही लिहायला सुरुवात केली. तरीही फारसा फरक पडला नाही”. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना भाग्यश्री देसाई पुढे सांगतात, “बघता बघता या नाटकाने वर्षभरात सुवर्ण महोत्सवी प्रयोगही साजरा केला. तरीही त्यानंतर दोनच दिवसांत पूर्वीप्रमाणेच काही फोन आले. आपल्या ‘अल्बम’मध्ये संधी द्यावी किंवा आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये मला यायचे आहे; अशा पद्धतीची आम्हाला विचारणा होऊ लागली. मग मात्र गंभीरपणे आम्हाला विचार करावासा वाटला आणि नाटकाच्या संपूर्ण टीमबरोबर चर्चा करून नाटकाचे नाव बदलण्याचे ठरवले. वास्तविक, ‘अमेरिकन अल्बम’ हे नाव नाटकाच्या आशयाला धरून चपखल होते; परंतु रसिकांचा संभ्रम दूर करण्याकरता आता १ मार्चपासून ‘अमेरिकन अल्बम’ हे नाव बदलून ‘तू भेटशी नव्याने’ या नावाने हेच नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बदललेल्या नावासह नाटकाला रसिकजन भरभरून प्रतिसाद देतील, याची आम्हाला खात्री आहे”.
इथे अजून एक महत्त्वाचे सांगायचे, तर या नाटकाच्या बाबतीत अशीच एक बदल घडवणारी गोष्ट २५ व्या प्रयोगाच्या दरम्यान घडली होती. मुंबई आणि शिकागो या शहरांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या नाटकात अमेरिकास्थित युवती ‘हनी’ हे एक पात्र आहे. या पात्राच्या बाबतीत त्यावेळी एक बदल केला गेला होता. त्यानुसार, नाटकाच्या शेवटी फक्त व्हीडिओच्या माध्यमातून दिसणारे हे पात्र; तेव्हापासून रंगमंचावर ‘एन्ट्री’ घेत असल्याचे दाखवण्यात येत आहे. तेव्हापासून केला गेलेला हा बदल लक्षात घेता, आता ‘तू भेटशी नव्याने’ हे या नाटकाचे नवीन शीर्षकही नाटकाच्या आशयाला समर्पक ठरायला हरकत नाही.