समर्थ कृपा – विलास खानोलकर
महाराजांनी एकदा निलेगावच्या भाऊसाहेब जागीरदारास शनिवारी येऊ असे सांगितले होते. पण निलेगावला जाण्यापूर्वी स्वामी समर्थांचे महानिर्वाण ३० एप्रिल १८७८ शके १८०० असा तो दिवस मंगळवारचा होता. त्यानंतर चारच दिवसांनी शनिवारी निलेगावच्या वेशीबाहेर मोठ्या वडाच्या झाडाखाली महाराज इतर सेवकरांसह आले आहेत, ही बातमी समजताच भाऊसाहेब त्यांचे कुटुंब तेथे आले. तेथे त्यांनी स्वामींची पूजा केली त्यांना घरी येण्याविषयी आग्रह केला. तो दिवस; शनिवारचा होता. पण श्री स्वामी समर्थांनी आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा येऊ असे वचन दिले. रात्र झाल्याने सर्व मंडळी घरी परतले. भोजन आटोपून परत सर्व मंडळी महाराज जेथे उतरले होते, तेथे परत आले. पाहतात तर महाराज अदृश्य झाले होते. सेवेकरीही नव्हते. भाऊसाहेब जागीरदारांनी खूप शोध घेतला. अखेर निराश होऊन ते परत घरी आले.
श्री स्वामींनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी परत येण्याचे वचन दिले होते. म्हणून स्वागताची सर्व तयारी करून महाराज येण्याची वाट पाहू लागली. तोच महाराज सर्वांसमोर येऊन उभे राहिले. त्यांना भोजनासाठी विनविले. पण एकही शब्द न बोलता जसे ते विराजमान झाले होते तसेच अचानक अंतर्धान पावले. स्वामींना शोधण्यासाठी भाऊसाहेबांनी माणसे धाडली. काही भक्त तर अक्कलकोटपर्यंत जाऊन आले. तेव्हा ते सर्व आश्चर्यचकित झाले कारण महाराज चार दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी समाधिस्त झाल्याची त्यांना बातमी समजली. याचाच अर्थ असा स्वामी समर्थ नेहमी सांगत असत कि,“भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे” आणि “हम गया नाही, जिंदा है।’’ भक्ताला दिलेल्या वचनाची पूर्तता स्वामी करतात. म्हणजेच स्वामी निर्गुण निराकार चैतन्य स्वरूपात आपल्या आवडत्या हजारो भक्तांना निरनिराळ्या ठिकाणी स्थळकाळाची पर्वा न करता आपल्या अस्तित्वाची खात्रीच करून देत असतात. म्हणजे अणू-रेणूमध्ये जसा ईश्वर भरून राहिलेला आहे, तसे स्वामींचे कार्यही भरून राहिलेले आहे. म्हणून भक्तांना स्वामींच्या आश्वासनाची प्रचिती येते, ते शब्द आहेत. हम गया नाही, जिंदा है ! याचाच अर्थ आपले आई-वडील, आजी-आजोबा व गुरू यांच्यातच तुमचा देव शोधा.
श्रीकृष्णाने भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।
!! बोला स्वामी समर्थ महाराज की जय !!