लखनऊ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात दररोज कोट्यवधी भाविक सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळत असल्याने प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली असली तरी त्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. काही दिवसांपूर्वी अमृतस्नानासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण बेपत्ता झाले. प्रशासन त्यांना शोधून घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
ज्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशा लोकांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरावे विधी केले. मात्र, काहींना अजूनही आप्त जिवंत परत येतील अशी आशा होती. अशीच एक अजब आणि आनंददायक घटना लखनऊमध्ये घडली.
Electricity : मुंबईत होणार समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती
स्थानिक रहिवासी खुंटी गुरु चेंगराचेंगरीत बेपत्ता झाले होते. त्यांचा मृत्यू झाला असावा असे समजून त्यांच्या शेजाऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. तेराव्याच्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मण भोजनाची तयारी सुरू असताना अचानक खुंटी गुरु स्वतः तिथे हजर झाले! त्यांना पाहताच शेजाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. काही वेळापूर्वी सुतकी असलेले वातावरण क्षणात आनंदोत्सवात बदलले. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय अवस्थींनी दिली.
खुंटी गुरु यांचे कुटुंब नाही; ते एकटेच राहत होते. मौनी अमावस्याच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी ते २८ जानेवारीला संगमस्थळी पोहोचले होते. २९ जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत ते हरवले आणि त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर, त्यांच्या मृत्यूचा गैरसमज होऊन शेजाऱ्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी छोटेखानी विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन केले. पण या सगळ्यात खुंटी गुरु सुखरूप परत येतील, हे कोणालाही वाटले नव्हते!