कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील १० पंखे बसवण्याचे काम पूर्णत्वास
विजेसाठी ८० लाखांची अनामत रक्कम भरावी लागणार
राष्ट्रीय महामार्गाकडून कार्यवाही सुरू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) बहुचर्चित कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील १० पंखे बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बोगद्यात २४ तास वीज पुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने ११ केव्ही वीज देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच महावितरणकडे पाठवला होता. बोगद्यात वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी ८० लाख रूपयांची अनामत रक्कम महावितरणकडे भरावी लागणार असून तशी प्रक्रियाही राष्ट्रीय महामार्ग खात्याने हाती घेतली आहे. यानंतरच दुसऱ्या बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक खुली होणार आहे.
सद्यस्थितीत कशेडीच्या एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे. तर दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासह भोगावनजीक अपूर्णावस्थेतील पुलाची कामे, पंखे बसवण्याच्या कामांसाठी सलग ५ महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
राजन साळवी शिवसेनेच्या वाटेवर, आदित्य ठाकरेंची दिल्लीपर्यंत पळापळ
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने दोन्ही बोगद्यातून वाहतूक सुरू करण्याचा मुहूर्त हुकल्यानंतर पुन्हा १५ दिवसांची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र ही डेडलाईन कितपत सत्यात उतरेल, याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.
पुलाच्या उभारणीसह क्युरिंगच्या कामासह दुसऱ्या बोगद्यात १० पंखे बसवण्याचे कामही पूर्ण झाले. मात्र बोगद्यात २४ तास वीज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने ११ केव्ही विजेच्या मागणीचा प्रस्ताव गतमहिन्यात महावितरणकडे पाठवला होता. त्यापोटी ८० लाख रूपयांची अनामत भरण्याबाबत महावितरणने राष्ट्रीय महामार्ग खात्याला सूचित केले होते. त्यानुसार अनामत रक्कम भरणा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने आवश्यक ती कार्यवाहीही सुरू केली आहे.
या साऱ्या पूर्ततेस आणखी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे कशेडीतील दुसरा बोगदा पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होण्याची वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कशेडीचा दुसरा बोगदा शिमग्यापर्यंत तरी सुरू होईल का? असा प्रश्न आता कोकणात जाणा-या चाकरमान्यांनी केला आहे.