Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेNamo The Central Park : नमो द ग्रँड सेंट्रल पार्कला १३.७० लाख...

Namo The Central Park : नमो द ग्रँड सेंट्रल पार्कला १३.७० लाख पर्यटकांनी दिली भेट

ठाणे : शहरातील कोलशेत येथे उभारण्यात आलेले ‘नमो ग्रँड सेंट्रल पार्क’ हे ठाणेकरांसह मुंबई महानगरातील नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंतसाठीच्या अनेक सोयीसुविधा या पार्कमध्ये असल्याने वर्षभरात या पार्कला १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. या नागरिकांच्या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ठाणे शहरातील कोलशेत परिसरात सुमारे २०.५ एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्क या उद्यानाची उभारणी फेब्रुवारी २०२४ मध्ये करण्यात आली. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. तसेच या उद्यानात विविध प्रकारची तीन हजार ५०० फुले-फळझाडे आहेत. त्याचप्रमाणे पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० हुन अधिक प्रजाती आढळून येत आहेत. ९ फेब्रुवारी २०२४ पासून हे उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. ठाणे शहरासाठीच नव्हे तर, मुंबई महानगरातील हे सर्वात मोठे उद्यान आहे. यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांसाठी हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. तसेच मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, जॉगर्ससाठी ट्रॅक आणि वृद्धांसाठी निवांत बसण्याची जागा यामुळे सर्व वयोगटांतील नागरिकांना या उद्यानाची आवड निर्माण झाली आहे. यामुळे या उद्यानात वर्षभरात ९ फेब्रुवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत उद्यानात १३ लाख ७० हजार नागरिकांनी भेट दिली आहे. नागरिकांच्या या भेटीमुळे पार्कला २ कोटी ८२ लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

ठाणे महापालिकेकडून या उद्यानात १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. तर, प्रौढांकडून २० रुपये शुल्क आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांकडून ३० रुपये शुल्क आकारण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांकडून प्रति दिवस १० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मासिक पासची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -