Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीवांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम जुलै २०२७ पर्यंत होणार पूर्ण

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम जुलै २०२७ पर्यंत होणार पूर्ण

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : वांद्रे पश्चिम परिसरात सागरी सेतू नजीक, महानगरपालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. सुमारे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या या प्रकल्पाची प्रारंभीची संरचनाविषयक कामे होवून उभारणीने आता वेग घेतला आहे. त्यादृष्टिने प्रत्यक्ष केंद्राच्या जागी भेट देवून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे या प्रकल्पांच्या आड येणाऱ्या सुमारे २६५ झाडे ही मालाड तसेच संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आदी परिसरांमध्ये नेवून यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे. हा प्रकल्प जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे.

वांद्रे (पश्चिम) येथे सागरी सेतूनजीक महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रगतीची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे, उप प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेंद्र परब, कंत्राटदार एल ऍण्ड टी यांचे वतीने प्रकल्प व्यवस्थापक विनया हेब्बार, सल्लागार कंपनी आयव्हीएल यांचे वतीने मुरली हे यावेळी उपस्थित होते.

Ladki Bhahin scheme : लाडकी बहीण योजनेत नवीन निकष नाही

वांद्रे मलजल प्रक्रिया केंद्राचे रचना, बांधकाम आणि प्रचालन व परिरक्षण करण्याचे काम कंत्राटदार मे. लार्सेन अँड टुब्रो लि. यांना ३१ मे २०२२ रोजी प्रदान केले गेले. प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी निर्मिती करण्याचे काम ०५ जुलै २०२२ पासून सुरू झाले. प्रकल्पाची रचना व बांधकाम कालावधी ५ वर्षे इतका आहे. ४ जुलै २०२७ पर्यंत प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचे सल्लागार म्हणून आयव्हीएल इंडिया एन्व्हायर्नमेंटल आर अँड डी प्रा. लि. जबाबदारी सांभाळत आहेत.

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी प्रकल्पाच्या प्रतिकृती (मॉडेल) ची पाहणी केली. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिमतः कसे असेल, त्याची आभासी प्रतिमा (व्हर्च्युअल मॉडेल) देखील ‘व्हर्च्युअल रिऍलिटी ग्लासेस’ द्वारे पाहिली. त्यानंतर संगणकीय सादरीकरणातूनही माहिती सादर करण्यात आली. प्रकल्पस्थळी बांधकामाच्या प्रगतीची तसेच सागरी पातमुख (आऊटफॉल), बांधकामाला लागणाऱ्या पाण्याची गरज भागविण्याकरिता नुकताच उभारण्यात येत असलेला प्रतिदिन २५० किलो लीटर क्षमतेचा कंटेनराइज्ड मलजल प्रक्रिया केंद्र आणि कामगारांचे शिबीर यांची गगराणी यांनी पाहणी केली.

झाडे कापण्याच्या परवानगीसाठी महापालिका बनवणार अ‍ॅप

उपआयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाची स्थापत्यविषयक प्रारंभिक कामे पूर्ण झाल्याने आता पुढील बांधकामाची स्थापत्य कामे वेगाने सुरु झाली आहेत. सन २०२५ आणि २०२६ या दोन्ही वर्षांमध्ये पावसाळ्यातही कामे होतील, अशारितीने नियोजन करण्यात आल्याने हा प्रकल्प ठरवलेल्या मुदतीत पूर्ण होईल. या प्रकल्पाचा प्रचालन व परिरक्षण कालावधी १५ वर्षे आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेश ताम्हाणे यांनी नमूद केले की, वांद्रे मलजल प्रक्रिया प्रकल्पाची भौतिक प्रगती २१ टक्के झाली आहे. स्थापत्य कामांनी पकडलेला वेग लक्षात घेता संयंत्रांची मागणी, खरेदी या प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्या आहेत.

महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी

उप प्रमुख अभियंता राजेंद्र परब यांनी सांगितले की, नवीन मलजल प्रक्रिया केंद्राची रचना आणि बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या मलजल प्रकल्पाचे प्रचालन व परिरक्षण देखील योग्यरित्या करण्यात येत आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि सागरी जीवनामध्ये सुधारणा होईल. तसेच माहीम, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी), खेरवाडी आणि सांताक्रूझ परिसरातील लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे, असे परब यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -