सांगली : महाराष्ट्र केसरी २०२५ ही स्पर्धा वादग्रस्त ठरली. अंतिम आणि उपांत्य सामन्यामध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्ष महाराष्ट्र केसरी खेळण्यास बंदी घालण्यात आली. पृथ्वीराज मोहोळ विरूद्धच्या कुस्तीत पाठ टेकली नाही तरी पराभूत म्हणून जाहीर करण्यात आले, असे शिवराज राक्षेने सांगितले. राक्षेने पंचांकडे नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी पंचाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे संतापलेल्या शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली. तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने १६ सेकंद बाकी असताना सामना सोडला होता. दोघांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. आता शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मातीच्या आखाड्यात कुस्ती रंगणार आहे. हा सामना सांगली जिल्ह्यात होणार आहे. या सामन्याचा निकाल काहीही आला तरी महाराष्ट्र केसरी २०२५ हा मान पृथ्वीराज मोहोळकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
पंचांच्या निर्णयांमुळे संभ्रम निर्माण झाल्यामुळे शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात कुस्तीचा सामना घेण्याचा विचार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला. या संदर्भात त्यांचे पृथ्वीराज मोहोळशी बोलणे झाले. पृथ्वीराज मोहोळने खेळण्याची तयारी दाखवली आहे. आता शिवराज राक्षेसोबत चर्चा करुन नंतर सामन्याचा दिवस आणि वेळ निश्चित करुन जाहीर केले जाईल; असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले. शिवराजला वाटत आहे त्याच्यावर अन्याय झाला आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्रे केसरी झालो का ? हा संभ्रम दूर करण्यासाठी कुस्ती खेळवण्याचा विचार केल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
कुस्तीपटू कधीही कुस्तीसाठी तयार असला पाहिजे. याच विचारातून सांगलीत सामना खेळवण्याबाबत पृथ्वीराज मोहोळ सोबत चर्चा केल्याचे चंद्रहार पाटील म्हणाले. लवकरच शिवराज राक्षे सोबतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामना सांगली जिल्ह्यातील तरुण भारत या स्टेडियमध्ये होणार असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले. सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपर आहे. सांगलीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हिंदकेसरी मारुती माने आणि सहा ते सात महाराष्ट्र केसरी झाले आहेत. केसरीवरुन सुरू असलेला वाद सांगलीमध्ये मिटावा हा आमचा हेतू असल्याचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले.
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई
महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.