Dwarkanath Sanzgiri : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

मुंबई : क्रिकेट समीक्षक, लेखक, मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी संझगिरी यांची प्राणज्योत मालवली. संझगिरींच्या पार्थिवावर शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



द्वारकानाथ संझगिरींचा जन्म १५ नोव्हेंबर १९५० रोजी दादरच्या हिंदू कॉलनीत झाला. किंग जॉर्ज स्कूल (आताचे राजा शिवाजी विद्यालय) आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, पूर्वीची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट), माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंग केले. मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या द्वारकानाथ संझगिरींना क्रिकेट प्रचंड आवडत होते. संझगिरी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.



संझगिरींनी १९७० च्या उत्तरार्धात क्रीडा विषयक लिखाण सुरू केले. 'दिनांक', 'श्री' मध्ये लिहून कारकि‍र्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या संझगिरींनी भारताने इंग्लंडमध्ये १९८३चा विश्वचषक जिंकल्यानंतर निवडक मित्रांच्या सहकार्याने 'एकच षटकार' हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. द्वारकानाथ संझगिरी हे 'एकच षटकार'चे कार्यकारी संपादक म्हणून काम करत होते. संझगिरींनी १९८० च्या दशकात ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करायला सुरुवात केली. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ गाजले. संझगिरी हे २५ वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या मराठी वृत्तपत्रासाठी क्रिकेट वृ्त्तांकन करत होते. त्यांनी अनेक क्रिकेट सामन्यांचे कव्हरेज केले. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी एक एकपात्री स्टँडअप टॉक शो पण केला. या शो चे देशाविदेशात हजारो प्रयोग झाले.

सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांचा त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, सचिन तेंडुलकरांच्या विक्रमी ३५व्या कसोटी शतकानिमीत्त त्यांचा सत्कार, १९७१ च्या इंग्लिश मालिका विजेत्या भारतीय संघाचा सत्कार आणि सचिन तेंडुलकरांचा सर्वात अलीकडचा त्यांची पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार अशा अनेक मोठ्या कार्यक्रमांची संकल्पना आणि अंमलबजावणीही त्यांनी केली आहे. 'बोलंदाजी' या टीव्हीवरील कार्यक्रमाचे ते प्रस्तुतकर्ता होते. 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या टीव्ही मालिकेचे ते पटकथा लेखक होते. क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणून त्यांनी मराठी वृत्त वाहिन्यांसाठी काम केले. द्वारकानाथ संझगिरी २००४ पासून ‘ती रा की ट धा’ आणि ‘स्वरा आर्ट्स’ या संस्थांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन करत होते. या संगीतमय कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपट आणि संगीत उद्योगातील दिग्गजांना संगीतमय श्रद्धांजली दिली जात होती.

द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके :

शतकात एकच - सचिन
चिरंजीव सचिन
दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी
खेलंदाजी
बोलंदाजी
चॅम्पियन्स
चित्तवेधक विश्वचषक २००३
क्रिकेट कॉकटेल
क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स
कथा विश्वचषकाच्या
लंडन ऑलिम्पिक
पॉवर प्ले
स्टंप व्हिजन
संवाद लिजंड्सशी
स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा
थर्ड अंपायर
इंग्लिश ब्रेकफास्ट

प्रवासवर्णन

फिश अँड चिप्स
मुलूखगिरी
फिरता – फिरता
पूर्व अपूर्व
फाळणीच्या देशात
भटकेगिरी
ब्लू लगून
माझी बाहेरख्याली
जीन अँड टॉनिक

चित्रपट आणि कलाकार

फिल्लमगिरी
तिरकटधा
ब्लॅक अँड व्हाईट
वो भुली दास्तान
आम्हांला वगळा
देव आनंद
लतादीदी
प्यार का राग सुनो
आशा भोसले, एक सुरेल झंझावात

व्यक्तीचित्रण

अफलातून अवलिये / दशावतार
वल्ली आणि वल्ली

विनोद

खुल्लमखिल्ली
स. न. वि. वि. /खुला खलिता

सामाजिक

तानापिहिनिपाजा
दादर - एक पिनाकोलाडा
रिव्हर्स स्वीप
वेदनेचे गाणे

संझगिरींना मिळालेले पुरस्कार

दत्ता हलसगीकर साहित्य पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचा साहित्यिक पुरस्कार
महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार
विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार
क्रीडाविषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार
वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार
Comments
Add Comment

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका