मुंबई : चेंबूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम सुरू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्धवट बांधकाम कोसळले आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली आहे. पहाटेची वेळ असल्याने या ठिकाणी वर्दळ नसल्याकारणाने दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असे असले तरी या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चेंबूरमधील सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. वडाळ्यापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. सध्या येथे मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असून सळई व काँक्रीटच्या साहाय्याने हे खांब उभारले जात आहे. यातीलच एक अर्धवट उभारलेला खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला आहे.
Kalyan – Shilphata Road : कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!
कोसळलेल्या सळ्यांची उंची २० फूट लांबीची आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेतला. या घटनेनंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परंतु, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पण आता ही घटना घडल्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.