पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भाजपाचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजपा सोबतच राहणार आहोत. तसेच महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआय ला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आरपीआयला ५ जागा मिळाल्या होत्या.
व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, वीरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
‘पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या’
पुणे शहरात जागोजागी आमच्या शाखा आहेत. त्यामुळे भाजपाने जरी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या शिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजपासोबतच राहणार आहोत. तसेच महायुती मध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून वाद सुरू असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न मार्गी लावतील असे सांगत, राज्य मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त आहे त्याजागेवर आरपीआयला मंत्रिपद द्यावे अशी मागणीही आठवले यांनी केली.
निवडणूका आलेल्या अनेक उमेदवारांचे पद जात वैधता प्रमाणपत्र जमा न केल्याने रद्द केले जाते. याकडे रामदास आठवले यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, आरक्षित जागेवर उमेदवार देताना पक्षांनी विचार केला पाहिजे. उमेदवारी देतानाच त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे की नाही यांची खातरजमा करूनच त्यांना पक्षाने उमेदवारी अर्ज दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली.