मुंबई : सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी तसेच अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात अनधिकृत मासेमारीचा वावर पाहता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तेथे आणखी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर’
राज्यात नऊ जानेवारीला या ड्रोन प्रणालीचा शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला होता. राज्यातील एकूण सात जिल्ह्यात नऊ ठिकाणी या ड्रोनद्वारे किनारपट्टीवर लक्ष ठेवले जात होते. मंत्री नितेश राणे यांनी २१ जानेवारी २०२५ रोजी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट देऊन ड्रोन प्रणाली यंत्रनेचा आढावा घेतला होता. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटींचा वावर मोठा असल्याचे निदर्शनास आले. तसेच गुजरात राज्यालगत असलेल्या पालघर जिल्ह्यातही परप्रांतीय मासेमारी नौका वारंवार घुसखोरी करताना आढळून येतात याची माहिती प्राप्त झाली . मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील ड्रोन, रेड झोनमुळे उडवताना अडचणी येत असल्याने हे दोन्ही ड्रोन रत्नागिरी व पालघर जिल्ह्याला हस्तांतरित करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार लवकरच हे दोन्ही ड्रोन रत्नागिरी व पालघर जिल्ह्याला देऊन तेथील ड्रोन प्रणाली यंत्रणा आणखी बळकट केली जाणार आहे.