Devendra Fadnavis : दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला!

  105

महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद


मुंबई : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑईल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई येथून सहभागी झाले.



सुरवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमीक फोरममध्ये देशातील अन्य सहा राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


‘कंट्री डायलॉग’ या सत्रात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणांचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या समवेत सहभाग घेतल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, यात आम्ही आपआपल्या राज्यांची शक्तीस्थळांची, वेगवेगळ्या राज्यांच्या विकास संकल्पनांची, गुंतवणूकसाठीची संधी याबाबतची माहिती दिली. एक भारत म्हणून सहा राज्यांनी भूमिका मांडत देशात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले. एका आवाजात एक भारत म्हणून भूमिका मांडली, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.


‘जल सुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य’ विषयांमध्ये देश आणि राज्याची भूमिका मांडली. जलयुक्त शिवारसोबतच जलसंधारणाच्या काय उपाययोजना राज्यात केल्या जात आहेत याचे सादरीकरण करता आले. आपापल्या राज्याची ताकद आम्ही येथे दाखवून देऊ शकलो. देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत ‘अट्रॅक्टीव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन’ असल्याचे जगाला पटवून देण्यात यश आल्याचेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी गुंतवणूकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे चाळीस टक्क्यांपर्यंत असते. पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्याबाबतीत सुमारे ६५ टक्के आहे. गतवर्षी दावोस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात चांगली सुरुवात झाली होती. त्यावेळी झालेल्या करारांची ९५ टक्क्यांपर्यंत अमंलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत याही वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्यातही एमएमआर हे मॅग्नेट समजले जाते. एमएमआरमध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. याशिवाय विदर्भ पाच लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र ३० हजार कोटी तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरींग हब हे शक्तीस्थळ ठरू लागले आहे. ही सगळी गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक असते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही विस्तारीत होते.


दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच का..?


दावोसमध्ये करार झालेले अनेक उद्योग भारतीयच आहेत तर दावोसमध्येच करार का अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. दावोसमध्ये जगभरातील सीईओ येतात. आपल्या कित्येक कंपन्या भारतीय असल्या तरी त्या आता वैश्विक झाल्या आहेत. या कंपन्यांचे विदेशी गुंतवणूकदार- भागिदारांशीही यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्कींगचे केंद्र आहे. भारतीय कंपन्यांना करार करताना त्यांचे विदेशी गुंतवणुकदार सोबत असावेत असे वाटणे गैर नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक होणारी ९५ टक्के गुंतवणूक विदेशी आहे. कराराचे रूपांतर प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. आतापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे ६५ ते सत्तर टक्के कराराचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यात झाली आहे. यावेळी सर्वच करार फलद्रुप करण्यावर आमचा भर आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता –एआय, आणि माहिती तंत्रज्ञान


कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याच्यादृष्टीने अनेक करार दावोस मध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये गुगलशी करार करण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी निर्माण करून एक परिसंस्था उभी करण्यावर आपण भर दिला आहे. डेटा हे न्यू ऑईल आहे. तेल क्षेत्राप्रमाणेच यात वाढीची मोठी क्षमता आहे. त्यामुळे डेटा सेंटर उभे करण्यावर आणि त्यामध्ये गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात आपल्याला यश आले आहे. एआय मध्ये महाराष्ट्राने सर्वात पहिले पाऊल टाकले आहे. गुगलशीही आपण याबाबत एक्सलन्स सेंटर स्थापन करण्याचा करार यापुर्वीच केला आहे. दावोस मध्ये ग्लोबल सीईओंशी चर्चा केल्याने या क्षेत्रातील रोजगार संधीची मोठी क्षमता लक्षात आली.


पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास


गुंतवणुकीचे करार आणि उद्योग आणताना पर्यावरणाचा आपण साकल्याने विचार केला आहे. विशेषतः हरित उर्जा, हायड्रो उर्जा, सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. स्वच्छ उर्जेतूनच आपल्याला पर्यावरण रक्षण करता येणार आहे.


जलसंवर्धनाच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचे काम तसेच यातील गुंतवणूकीची माहिती आपण दिली. तसेच ऊर्जा क्षेत्रातील नवे प्रवाह – एनर्जी ट्रान्झिशन मध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. २०२२ मधील १३ टक्क्यांवरून आता आपण २५ टक्के तर २०३० मध्ये ५० टक्क्यांपर्यंचे लक्ष्य गाठणार आहोत. महाराष्ट्र हे ईव्ही सेंटर असेल. त्यामुळे शाश्वत ऊर्जा क्षेत्राच्याबाबतीत आपण सौर ऊर्जेसह अनेक क्षेत्रात काम करत असल्याची मांडणी करता आली.


विक्रमी गुंतवणूकीसाठी टीमचेही कौतूक


दावोस दौऱ्यातून गुतंवतणूकीचे विक्रमी उद्दीष्ट् साध्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्यासह उद्योग विभाग, एमआयडीसी तसेच सल्लागार संस्था, त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांनी या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, विविध यंत्रणांशी चांगला समन्वय, संपर्क ठेवल्याने हे उद्दीष्ट साध्य करता आल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.


दावोस मध्ये आज दृष्टिक्षेपात...


जपानच्या सुमिटोमी समुहाची राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रात ४३ हजार कोटींची गुंतवणूक. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईतील पायाभूत सुविधा क्षेत्राच्या प्रगतीला चालना. जपान आणि महाराष्ट्राच्या दरम्यानच्या सौहार्द, सलोख्याचे उत्तम उदाहरण. सुमिटोमी समुहाचे प्रेसिडेंट कोजून निशीमा सॅन यांचे नेहमीच महाराष्ट्र आणि मुंबईकरिता सहकार्य.

Comments
Add Comment

Hartalika 2025: अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते हरतालिकेचे व्रत

मुंबई : हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला हरतालिका व्रताचा सण यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होत

Mumbai Police: मुंबई पोलिसांची कौतुकास्पद मोहीम, चोरीला गेलेले ८,००० मोबाईल परत मिळवून दिले

मुंबई: मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली

GSB Ganpati First Look: मुंबईतील सगळ्यात श्रीमंत बाप्पाची पहिली झलक दिमाखात सादर

मुंबईच्या GSB सेवा मंडळाच्या बाप्पाच्या फर्स्ट लुकचे दिमाखात अनावरण  मुंबई: गणेश चतुर्थीसाठी आता एकच दिवस बाकी

Ganeshotsav 2025: वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले ५२ फूटी काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई: दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी