मुंबई : देशातील सर्वात मोठ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी- वाहनचालकांसाठी अटल सेतूच्या शेवटी जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
अटल सागरी सेतूवरुन प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांसाठी खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता आता अटल सेतूच्या नवी मुंबईच्या दिशेला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप बांधण्यात येणार आहे. या दोन्ही सुविधा खासगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ पासून यासाठीच्या प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एका खासगी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अटल सेतूच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप असणार आहे. येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटात पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सेतू जानेवारी २०२४ पासून वाहतूक सेवेत दाखल झाला. या सेतूवरून दिवसाला सरासरी २२ हजार ५०० वाहने धावतात. त्यात ७० टक्के वाहने चारचाकी आहेत.सेतूच्या समुद्रावरील भागावर वाहन थांबवून उतरण्यास परवानगी नाही. या सागरी सेतूमुळे प्रवास अतिजलद झाला आहे. आता अटलसेतूवर खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनचालक-प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.