५५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ८७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
पालघर : ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथून पालघर जिल्ह्याच्या विरारपर्यंत प्रस्तावित असलेल्या (Uttan-Virar Sea Bridge Project) सागरी सेतू प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून, ५५ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी राज्य सरकारच्या मान्यतेसाठी हा आराखडा व प्रकल्प एमएमआरडीएमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या मार्गासाठी ८७ हजार कोटींच्या जवळपास खर्च अपेक्षित आहे.
बहुउद्देशीय असा असलेला हा सागरी सेतू मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे तसेच पुढे विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात दिल्लीवरून या मार्गाने थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता असून जपानच्या जीका संस्थेकडून कर्ज उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला एकदा मान्यता दिल्यास परदेशीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजुरी घेण्यासाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. उत्तन ते विरार सागरी मार्ग दक्षिण येणार आहे. उत्तन ते विरार सागरी मार्ग दक्षिण मुंबईला जोडला जाणार असल्यामुळे नरिमन पॉईंट ते विरार असा प्रवास अवघ्या एका तासात करता येणे शक्य होणार आहे.
Ajit Pawar : लाडक्या बहीणींसाठी ‘महिला व बाल विकास’कडे ३,७०० कोटींचा चेक जमा
ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील सुभाष चंद्र बोस उद्यानाजवळ हा मार्ग सुरू होणार असून पालघर जिल्ह्यातील विरार बापाने येथे त्याचा कनेक्ट केला जाणार आहे. या मार्गावरून पुढे दिल्ली मुंबई महामार्गाला जोडणी दिली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ५५ किलोमीटर इतकी असून २४ किलोमीटरचा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे.उत्तन येथे दहा किलोमीटर, वसई येथे अडीच किलोमीटर तर विरार येथे जोडणीसाठी १९ किलोमीटरवर कनेक्टर असणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल व आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रकल्पासाठी परकीय वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठी तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर निधी उपलब्ध झाल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
विरार उत्तन हा पहिल्या टप्प्यातील २४ किलोमीटरचा सागरी सेतू चौपदरी करणाचा असणार आहे. यामध्ये एक लेन अत्यावश्यक सेवेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. चार लेन व एक अत्यावश्यक सेवेसाठीची लेन अशी १९.५ मीटर रुंदी मार्गाची असणार आहे. उत्तन विरार या सागरी सेतूच्या कामाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मार्च २०२४ मध्ये मान्यता दिली आहे.
पूर्वी हा प्रकल्प वर्सोवा ते वीरार असा ९४ किलोमीटरचा सागरी सेतू प्रकल्प होता. मात्र तो रद्द करण्यात आला असून उत्तन ते विरार असा प्रकल्प करण्यात आला. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सागरी सेतूची संकल्पना समोर आली होती. वर्सोवा ते दहिसर, भाईंदर असा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याने त्याची कार्यवाही सुरू केली. एकाच ठिकाणी दोन प्रकल्पाचे नियोजन करणे व्यवहार्य नसल्यामुळे राज्य सरकारने वर्सोवा ते विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द करून उत्तन ते विरार असा प्रकल्प मंजूर केला. पुढे विरार ते पालघर असा सागरी मार्ग किंवा सेतू बांधण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.