उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार, याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. तसेच योजनेबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात, अशीही चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील, असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला. पण माझ्याकडे अर्थ खाते आहे. आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू. जी भगिनी खुरपणीला जाते, धुणी-भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे. जिला १५०० रुपयांचे महत्त्व समजते, तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Amitabh Bacchan : डॉक्टरांच्या आश्वासक हमीमुळेच रूग्णांचा ५० टक्के आजार होतो बरा
अजित पवार पुढे म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. म्हणजे महिन्याला २१ हजारांच्या आत वेतन असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आवाहन आहे की, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे, त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते. तशाच प्रकारे आताही केले जावे. पण परवाच महिला व बाल विकास खात्याकडे ३,७०० कोटींचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.