मुंबई : आम्हा तिघांच्या महायुतीमध्ये चौथ्या सहकाऱ्याची गरज नसून, शेवटपर्यंत महाराष्ट्रात आमची महायुतीच राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. यामुळे मविआ सोडून उद्धव ठाकरेंचा गट महायुतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात स्पष्ट उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.
पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, नौदलाच्या तीन नौकांचे राष्ट्रार्पण
उद्धव गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक होत आहे, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचे असते. कौतुकांबाबत सतर्क राहायचे असते. अनेकदा राजकारणात फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केले जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत’; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाचा भविष्यात महायुतीत समावेश करण्याबाबत विचार होऊ शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘आमच्या तीन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. त्यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील’; असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘आम्हाला मिळालेले पद हे पद नसून, ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकाऱ्याच्या यादीत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे’; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशसेवा आणि समाजसेवा करण्याचे संस्कार लहानपणीच संघाच्या शाखेत जायचो तेव्हा झाले असल्याचे फडणवीस म्हणाले.