मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी १५ जानेवारी रोजी पहिल्यांदा मुंबईत येत आहेत. याआधी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी निमित्त मुंबईत आले होते. पंतप्रधान यावेळच्या मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील. तसेच नौदलाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित असतील. या कार्यक्रमात नौदलाच्या एक फ्रिगेट, एक विनाशिका आणि एक पाणबुडी अशा तीन नौकांचे राष्ट्रार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत सकाळी आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण होईल. दुपारी ३.३० वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील.
एकाचवेळी नौदलासाठी तीन युद्धसज्ज जहाजांचे राष्ट्रार्पण ही नौदलाच्या इतिहासातील एक मोठी यशोगाथा म्हणावी लागेल. एक विनाशिका, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या गोदीत ‘प्रकल्प १५ ब’ अंतर्गत चार विनाशिका, ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत चार फ्रिगेट्स व ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत सहा पाणबुड्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार ‘प्रकल्प: १५ ब’मधील चौथी व अखेरची विनाशिका, प्रकल्प १७ अ मधील पहिली फ्रिगेट व प्रकल्प ७५ मधील सहावी व अखेरची पाणबुडी एकाचवेळी नौदलाकडून ताफ्यात सामावून घेतली जात आहे.
निलगिरी फ्रिगेट आणि सुरत विनाशिका यांच्यावरुन चेतक, ध्रुव (आधुनिक हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर), सी किंग, एमएच – ६० आर – सी हॉक ही हेलिकॉप्टर दिवस – रात्र कोणत्याही वेळी उतरू शकतील अथवा उड्डाण करू शकतील. यामुळे या दोन्ही नौकांच्या मदतीने रात्रंदिवस काम करणे शक्य आहे. दोन्ही नौकांवर नौसैनिकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची आधुनिक आणि आरामदायी अशी व्यवस्था आहे. महिला नौसैनिकांसाठी या नौकांवर विशेष व्यवस्था आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या शिवालिक श्रेणीच्या निलगिरी फ्रिगेट आणि कोलकाता श्रेणीच्या सुरत विनाशिका या रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या नौकांची रचना खोल समुद्रातही वेगाने हालचाल करण्यासाठीच केली आहे.
कलवरी श्रेणीची वाघशीर ही पाणबुडीही स्टेल्थ तंत्रज्ञानाने तयार केली आहे. यामुळे ही पाणबुडी रडारपासून स्वतःचे नेमके अस्तित्व दीर्घकाळ लपवण्यास सक्षम आहेत. अतिशय कमी आवाज करत वावरणाऱ्या या पाणबुडीची संहारक क्षमता मोठी आहे. टॉर्पेडो (पाणतीर), क्षेपणास्त्र, प्रगत सोनार प्रणाली यांच्या मदतीने समुद्रातून समुद्रावर, समुद्रातून जमिनीवर किंवा आकाशात, पाणबुडी विरोधी युद्धात प्रभावी कामगिरी करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे.
नौदलात दाखल होत असलेली सुरत विनाशिका ही कोलकाता श्रेणीची चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. तसेच वाघशीर पाणबुडी ही कलवरी श्रेणीची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. माझगाव गोदीने निलगिरी फ्रिगेट, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडी यांची निर्मिती करून आत्मनिर्भर भारत या भारत सरकारच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.
प्रकल्प १५ ब – आयएनएस विशाखापट्टणम श्रेणी – आयएनएस सुरत विनाशिका
प्रकल्प १७ अ – आयएनएस निलगिरी श्रेणी (नवीन श्रेणी या युद्धनौकेपासून सुरू) – आयएनएस निलगिरी फ्रिगेट
प्रकल्प ७५ – आयएनएस कलवरी श्रेणी – आयएनएस वाघशीर
मोदींचा नवी मुंबई दौरा, वाहतूक मार्गात बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार १५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नवी मुंबई येथील खारघरमध्ये इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनासाठी येत आहेत. उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी एक ते दोन तास मंदिरात असतील. या कालावधीत ते मंदिराची आणि तिथल्या व्यवस्थेची पाहणी करतील तसेच इस्कॉनच्या सदस्यांशी संवाद साधतील. मोदींच्या या दौऱ्यामुळे नवी मुंबईत वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहे. नागरिकांनी या सूचनांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे; असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने केले आहे.
मा.व्ही .व्ही.आयपी . हे नवी मुंबई, खारघर येथे दि १५/०१/२०२५ रोजी इस्कॉन मंदिर याचे उद्धघाटन समारंभसाठी उपस्थित राहणार आहेत . त्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतुक शाखे मार्फत वाहनांना प्रवेश बंद व त्याला पर्यायी मार्ग तसेच नो पार्किंग बाबत काही सूचना देण्यात आलेले आहेत . #trafficalert pic.twitter.com/v7buyj8Tvh
— नवी मुंबई पोलीस – Navi Mumbai Police (@Navimumpolice) January 14, 2025