Monday, June 8, 2026

Sunil Tatkare : NDA बैठकीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बदल; सुनील तटकरे यांची माहिती

Sunil Tatkare : NDA बैठकीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बदल; सुनील तटकरे यांची माहिती

MUMBAI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत बुधवारी (१० जून) 'एनडीए'ची (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महायुती आणि एनडीएचे घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. हे दिल्लीतील निमंत्रण अत्यंत महत्त्वाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा नियोजित २७ वा वर्धापन दिन सोहळा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, आता हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ११ जून रोजी दुपारी २ वाजता सायन येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

नवी दिल्लीत होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकीला देशभरातील 'एनडीए’चे सर्व घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. "मुख्यमंत्री महोदयांमार्फत आम्हाला हे निमंत्रण आले असून, या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मी स्वतः उपस्थित राहणार आहोत," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

"अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर आम्ही हा पहिलाच वर्धापन दिन साजरा करत आहोत. अतिशय संयमाने आणि धिरोदत्तपणाने राष्ट्रीय अध्यक्षपदाची व उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे सुनेत्रा वहिनींनी हाती घेतली असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाची नव्याने उभारणी सुरू आहे. त्यामुळे पक्षाचा हा २७ वा वर्धापन दिन दादांना समर्पण करत 'संघर्ष आणि संकल्प' या विचारासह साजरा केला जाईल. फक्त १० ऐवजी ११ जून या तारखेचा बदल कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावा," असे आवाहन त्यांनी केले.

२०२९ च्या निवडणुकीला 'एनडीए' म्हणून लढणार

पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, "आम्हाला २०२९ च्या निवडणुकीला 'एनडीए' म्हणून सामोरे जायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षणाच्या निर्णयानंतर प्रलंबित जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा नियोजित केला जात आहे. एसआयआर कार्यक्रमासोबतच बूथ पातळीपासून देश पातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल," असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >