ऋतुराज – ऋतुजा केळकर
आज राजेश खन्ना यांचा रोटी चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. या चित्रपटात सुरुवातीलाच राजेश खन्ना एका पोळीकरिता कुणाचा तरी खून करून जेलमध्ये जातो असं दाखवण्यात आले आहे. खरंच अन्नाकरिता माणसाला काय काय करावे लागते नाही का? या चंद्रासारख्या गरगरीत गोल पोळीकरिता माणसाचा राक्षस होऊ शकतो.
या देवी सर्वभूतेषु क्षुधा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
आजच शाकंभरी नवरात्रोस्तवाचा आरंभ झाला आहे. शाकंभरी म्हणजे अन्नपूर्णा देवी. एकवेळ माणूस वस्त्राशिवाय राहू शकेल पण पोटात अन्न गेले नाही तर माणूस जगू शकत नाही.
काळा असो वा गोरा देहाचा गर्व करणाऱ्या प्रत्येकालाच भूक ही लागतेच. देहावर लाखो रुपयांची वस्त्रे घालून त्याला अनमोल रत्नांनी सजवून, सुगंधी द्रव्ये चोळून कितीही मोठेपणाचा आव आणला तरी टीचभर पोटाच्या भुकेकरिता तितक्याच अन्नाची गरज असते जितकी की रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याला. ‘भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा’ हेच जर त्रिकालाबाधित सत्य आहे त्यातूनच हे संसारिक कलह निर्माण होतात आणि मग ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?” या एका असूयेतून निर्माण होते ती चढाओढ. सुखाविलासांची लागलेली चटक माणसाला निगरगट्ट बनवते.
दुसऱ्याच्या ताटातील पोळी पळवताना मग त्याच्या भावना बोथट होत जातात. सवयीने कैद्याला अंधारकोठडी देखील राजमहाल वाटू लागते आणि मग अंतरात्म्यात तसेच काहीसं घडू लागतं. दुसऱ्याच्या डोळ्यांतील आसवांच्या तेलाने आपल्या राजमहालात रोषणाई करणाऱ्यांना कर्माच्या सिद्धांताचा विसर पडू लागतो, अंतकरणात विचार विकासाच्या वेलीला अहंकाराची गंधमत्त फुले फुलू लागतात. मग कधी ज्यांच्या जीवावर आपण निवडून आलो त्याच मतदारांना एखादा नेता ‘वेश्या’ म्हणून संबोधतो तर कधी स्त्रीदाक्षिण्य न बाळगता समोरील पक्षातील स्त्रीच्या गालांचा अत्यंत वाईट पद्धतीने उल्लेख करतो. संस्कारित व्यक्ती ही हजारजणात सहजतेने उठून दिसते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी माननीय मंगल प्रभात लोढा यांनी घेतलेली संस्कृतमधील शपथ किंवा भल्याभल्या नेत्यांची शब्दोच्चारात तारांबळ होत असताना मालवणी संस्कृतीत वाढलेल्या माननीय नितेश राणे यांनी ‘सदसद्विवेकबुद्धी’ या शब्दाचा केलेला स्वच्छ उच्चारच त्यांच्या भाषेवरीलच नव्हे तर नवनिर्मितीकरिता स्वतःमध्ये देखील बदल घडवून आणण्याची क्षमता दाखवून देतो. कसं आहे ना की आकार अनेकानेक असले ना तरीही आत्म्याच्या ज्योतीचे रूपांतर हे समईच्या किंवा निरांजनाच्या ज्योतीत करायचे की अणुबॉम्बमधील विध्वंसकतेत करायचे हे ज्याचे त्याने आपापल्या कर्माने ठरवायचे असते.
समाजातील लोक हे लहान बालकाप्रमाणे चंचल असतात असे वाटत असले तरी ही ते आपल्यावर डोळ्यांत अंजन घालून आपले सुक्ष्मावलोकन करत असतात. त्यामुळे आपल्या जीवनाला जर नीटस आणि निकोप आकार द्यायचा असेल तर लोकाभिरुची करिता आपल्या अभिरुचींना जाणीवपूर्वक सात्त्विकतेच्या निरांजनाने तसेच करुणेच्या अनुसंधानाने आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्याला उजळून टाकले पाहिजे. कारण भाकरीचा भुतकाळ हा जितका प्राचीन आहे तितकाच कर्माचा देखील. म्हणूनच अध्यात्म आणि परमार्थ यांची सांगड घालून आत्म्याच्या तळगाभाऱ्याला शब्द, संस्कार आणि अस्त्र यांचे मंथन करून देहोत्सवाच्या वाटेवर विसावू न देता आयुष्यातील दुःखाच्या ढगप्रणालींना कर्तृत्वाच्या कमंडलुतील तीर्थाने असे अभिमंत्रित करा की, येणाऱ्या प्रत्येक पिढ्या ह्या आपल्या पंथाप्रणालीवर सहजतेने मार्गक्रमण करत राहतील. असं जर झालं तर मग माझ्याच शब्दात सांगायचं झाल तर…
‘कृष्ण माझ्यातला मीच शोधला…
अन्… कर्माच्या भाकरीतील
चंद्र वाटता वाटता…
आत्म्यातील कर्ण…
जनमानसी अवतरला…
अन्…
कापरासम देह…
प्रत्येक श्वासात भरून राहिला…
प्रत्येक श्वासात भरून राहिला …’