श्रद्धा बेलसरे खारकर – काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा
आजच्या काळात ‘मला पैसे देऊ नका’ असे म्हणणारा माणूस कुणाला भेटेल का? त्यात जर तो आजारी माणूस भिक्षेकरी असेल आणि आजच्या १२ अंश थंडीत एका फाटक्या बरमुड्यात थंडगार जमिनीवर पडलेला असेल? पण काल रात्री हे माझ्या बाबतीत घडले. त्याचे असे झाले – मध्यरात्री १२ च्या सुमारास मी, माझे पती श्रीनिवास, ‘एक घास फौंडेशन’चे शिवराज पाटील आणि मोनिका पाटील पुण्यात बाहेर झोपणाऱ्या निराधार लोकांना ब्लँकेट वाटत फिरत होतो.
ओंकारेश्वर मंदिराच्या पुलाजवळ एक वृद्ध इसम दिसला. तो बसला होता. अंगात अर्धी विजार होती. एक पाय गुडग्यापासून चिंध्यांनी बांधला होता. अंगावर अनेक जखमा होत्या. आम्ही त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले. अतिशय प्रेमळ स्वभावाच्या आमच्या शिवराज पाटलांचे तेवढ्याने समाधान झाले नाही. त्यांनी त्या वृद्ध माणसाला विचारले, “बाबा, झोपा आता निवांत. तुम्हाला अजून काही हवे का?’ तर तो म्हणाला, ‘भाऊ, लई आशीर्वाद आहेत तुम्हाला. काही नको.’ शिवराज थोडे घुटमळले. त्यांचा हात खिशाकडे गेला. यावर तो मनुष्य लगेच मोठ्याने म्हणाला, ‘नको. मला पैसे नकोत. पैसे देऊ नका.’ यावर मी म्हटले, ‘पैसे नाहीत काका, पांघरून आहे. थंडी किती वाजतेय बघा.’ त्यांनी पांघरून अंगाभोवती गुंडाळून घेतले. खाली अंथरायला एक फाटके कापड होते. मग आम्ही अजून एक ब्लॅकेंट त्यांच्या अंगावर टाकले. त्यांच्या त्रस्त चेहऱ्यावर समाधान उमटले. ते पुन्हा आशीर्वाद देऊ लागले. शिवराजने दोन्ही पांघरूणे एकत्र नीट जोडून अंगावर घातली आणि म्हणाला, ‘काका आता झोपा.’ क्षणार्धात ते बाबा झोपेच्या अधीन झाले.
असाच दुसरा अनुभव. एका सिग्नलच्या त्रिकोणात एक म्हातारी बाई अंगाचे मुटकुळे करून झोपली होती. तिच्या अंगावर पांघरूण टाकले. ती जागी झाली म्हणाली, ‘काय आहे?’
‘आजी, पांघरूण आहे.’
तिच्या अंगावर एक पातळ पांघरूण होते, इतक्या थंडीत त्या पांघरुणाने ऊब येणे शक्य नव्हते. पण ती बाई जे म्हणाली त्याने मला धक्काच बसला. आहे त्या पांघरुणातच गुरगुटून घेत ती म्हणाली, ‘बघा. माझ्याकडे एक पांघरूण आहे. ते दुसऱ्या कुणाला तरी द्या.’ आम्ही तिला आग्रहाने दुसरे पांघरूण घ्यायला लावले. मनात विचार आला. आपल्याला एका घरानंतर दुसरे घर हवे असते, त्यानंतर फार्म हाऊस बांधायचे असते, एक गाडी विकून दुसरी नवी मोठी गाडी घ्यायची असते आणि इथे! मरणाच्या थंडीत रस्त्यावर निराधार पडून असताना आजींना दुसरे पांघरूण दुसऱ्या कुणातरी गरजवंताला द्यायचे होते!! मनातल्या मनात हात जोडले त्या माऊलीला! आणि पुढे निघालो.
ससूनच्या आवारात गेलो. एक बापलेक थंडीत उघड्यावर बसले होते, त्या गृहस्थाची पत्नी दवाखान्यात होती. हे लोक पंढरपूरवरून आले होते. त्यांना पांघरूण दिले. शिवराजने नमस्कार करताना त्या बाबांना हात लावला. मुलगा म्हणाला, ‘बाबांच्या अंगात ताप आहे. थंडीने त्रास होतो आहे. पण तुमच्या रूपाने पांडुरंग आला. आता झोप तरी येईल त्यांना!’
उशिरापर्यंत आम्ही फिरत होतो. २ वाजता कर्वेनगरजवळ रस्त्यावरून सायकल हातात धरून एक जोडपे चालताना दिसले. सायकलला अनेक खेळणी लटकवलेला बांबूचा स्टँड बांधला होता आणि रमेश चालत होता. सोबत त्याची कृश पत्नी ममता हातात काही पिशव्या घेऊन चालत होती. झाडू, केरसुणी, फुगे अशा अनेक वस्तू त्यांच्याजवळ होत्या. गरीब कामगार दिसत होते. दोघांच्याही अंगात स्वेटर वगैरे काहीच दिसत नव्हते. आम्ही आपापसात बोलून ठरवले की, त्यांनाही एकेक ब्लँकेट देऊन टाकावे. बिचारे थंडीत कुडकुडतच चालले होते. त्यांना दोन पांघरूणे दिली. बिचारे खूश झाले. संकोचत रमेश म्हणाला, ‘आपका बहुत बहुत धन्यवाद, साहब.’ मग त्यांनी त्यांच्याकडची एखादी वस्तू (जणू रिटन गिफ्ट म्हणून) आम्ही घ्यावी असा आग्रह केला. छोट्यातला छोटा माणूसही आपली कृतज्ञता कशी व्यक्त करतो ते पाहून फार छान वाटले. मी विचारले, ‘इतक्या रात्री का काम करता? त्याने उत्तर दिले, विक्रीसाठी लांब चालत जावे लागते. आता परतताना उशीर झाला इतकेच.’ चालता चालता मग राजस्थानमधून आलेला तो माणूस म्हणाला, ‘साहेब तुम्ही हे वाटतच जात आहात ना? मग इथून पुढे गेल्यावर पुलाजवळ माझे काही साथीदार आहेत. त्यांनाही वाटले तर द्या.’ आम्ही त्यांना शोधत गेलो. थोड्याच अंतरावर उघड्या रस्त्यावर १०-१२ बायका-मुले एकेक पांघरूण घेऊन थंडीमुळे चुळबूळ करत पडून होते. असल्या थंडीत झोप लागणे शक्यच नव्हते. त्यांनाही पांघरूण देऊन आम्ही घरी परतलो.
अनेक दुलया आणि चादरी घेऊनही लवकर झोप येतच नव्हती. विचारचक्र सुरू होते. ‘मला हवे, मला हवे.’ म्हणणारे आज हजारोंनी दिसतात. अब्जावधी कमावूनही ते कधीच तृप्त होत नाहीत. पण एक पांघरूण असताना दुसरे ‘इतर कुणाला तरी द्या’ म्हणणारे भिक्षेकरी!! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एका मतांची किंमत ३-४ हजारांपर्यंत पोहोचली आहे. उमेदवारांची संपत्ती कोटींच्या कोटी असल्याची माहिती सरकारकडे नोंदवलेली असते. पण अजूनची हाव काही संपत नाही. निरपराध लोकांच्या अन्नात रसायनांचे विष कालवूनही व्यापाऱ्यांचे समाधान होत नाही. कुठेच तृप्ती दिसत नाही. पण मग कडाक्याच्या थंडीत कुडकुडत जमिनीवर पडून असताना दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या या माणसांना भिकारी तरी कसे म्हणावे. तेच तर खरे श्रीमंत आहेत आणि आपण?