Monday, August 4, 2025

सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळणार ?

सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळणार ?
सिडनी : बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातून अपयशी खेळाडूंना वगळले जाईल अशी चर्चा आहे. कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुरता अपयशी ठरला आहे. यामुळे सिडनी कसोटीत रोहित शर्मा तसेच फिट नसलेले खेळाडू आणि वाईट कामगिरी करणारे खेळाडू यांना वगळण्याचा विचार सुरू आहे.



ऑस्ट्रेलियाने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील चार पैकी दोन कसोटी सामने जिंकले आहेत तर भारताने एक कसोटी सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे शेवटची कसोटी अनिर्णित राहिली अथवा रद्द झाली अथवा ऑस्ट्रेलियाने जिंकली तर स्पर्धा ऑस्ट्रेलियाच जिंकेल. भारताला स्पर्धा बरोबरीत सोडवण्यासाठी सिडनी कसोटी जिंकावीच लागेल. भारतासाठी जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती आहे. या आणीबाणीमुळेच भारतीय संघ बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ मधील आधीच्या चार कसोटींमधील कामगिरीआधारे सिडनी कसोटीचा संघ निश्चित करणार आहे. हे करताना आधीच्या चार कसोटी सामन्यांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वगळले जाण्याची शक्यता आहे.



यशस्वी जयस्वाल, नितीश रेड्डी, केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी या भारतीय खेळाडूंनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.



भारतीय वेळेनुसार शुक्रवार ३ जानेवारीपासून सिडनी कसोटी सुरू होत आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सुरू होईल.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  1. पहिली कसोटी, पर्थ - भारताचा २९५ धावांनी विजय - रोहित शर्मा खेळला नाही

  2. दुसरी कसोटी, अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ धावा करून बाद

  3. तिसरी कसोटी, ब्रिस्बेन - अनिर्णित - रोहित शर्मा पहिल्या डावात १० धावा करून बाद

  4. चौथी कसोटी, मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा १८४ धावांनी विजय - रोहित शर्मा पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ९ धावा करून बाद


कर्णधार रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी २०२४ - २५ या स्पर्धेत पहिल्या चार कसोटींमध्ये मिळून फक्त ३१ धावा केल्या आहेत.भारताचा प्रमुख फलंदाज असूनही त्याने एवढी वाईट कामगिरी केली आहे. यामुळेच रोहितला सिडनी कसोटीत खेळवावे की नाही, असा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >