माध्यम प्रायोजक प्रहार
मुंबई : लक्ष्यवेध या संस्थेच्या माध्यमातून ३ आणि ४ जानेवारी २०२५ रोजी ठाणे शहरातील टीपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा (Lakshyavedh Business Fair) या महत्वकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बिझनेस जत्राचे हे चौथ पुष्प आहे. राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर बिझनेस जत्रेला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. लक्ष्यवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे, ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छत्राखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त होईल.
ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून, एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील. परिणाम स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्या प्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे लक्ष्यवेध बिझनेस जत्रामध्ये, सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन, एकमेकांशी संवाद साधतील. नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातले २५पेक्षा जास्त नामांकित उद्योजक आणि वक्ते १० हून अधिक उद्योजकीय परिसंवादांमध्ये सहभागी होतील.
बिझनेस जत्रानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनामध्ये लघु आणि मध्यम उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनाला १० हजाराहून अधिक जण दोन दिवसात भेट देतील.
या प्रदर्शनामध्ये लघुउद्योजकांसह अनेक बलाढ्य कंपन्या सहभागी होतात. त्यामुळे लघु उद्योजकांचा त्यांच्याशी थेट संवाद होऊ शकणार आहे. अनेक बँकांचे स्टॉल्स देखील या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने अर्थसहाय्याच्या संदर्भातला मार्गदर्शन लघु उद्योजकांना या ठिकाणी मिळणार आहे. देश आणि राज्य पातळीवरील अनेक व्यावसायिक आणि नेटवर्किंगच्या संघटना या प्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत याचा थेट फायदा या ठिकाणी येणाऱ्या विजिटर्स ना त्याचप्रमाणे लघुउद्योजकांना होईल आणि नेटवर्किंगच्या अनेक संधी उपलब्ध होतील. फ्रेंचायसी मॉडेल वर काम करणारे अनेक व्यवसायांची माहिती या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. बिझनेस जत्रा निमित्त होत असलेल्या परिसंवादामध्ये अनेक उद्योजक सहभागी होतील. त्यांच्या अनुभवाचा थेट फायदा लघु आणि मध्यम उद्योजकांना होईलच. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत याचा देखील फायदा उद्योजकांना होणार आहे. बिझनेस जत्रेच्या प्लॅटफॉर्मवर अनेक उद्योजक आपापल्या उत्पादनांचे लोकार्पण करणार आहेत, त्यामुळे अनेक उद्योजकांना आपल्या प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी मोठी संधी मान्यवरांच्या उपस्थितीत मिळणार आहे.
शासकीय योजनांची माहिती उद्योजकांना मिळावी या दृष्टिकोनातून देखील काही विशेष मार्गदर्शन सत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत, त्याचाही लाभ उद्योजकांना होणार आहे. लघु आणि मध्यम उद्योजक बलाढ्य कंपन्या यशस्वी उद्योजक नेटवर्किंगच्या संघटना व्यवसायिकांच्या संघटना वित्तीय संस्था शासकीय संस्था या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून व्यवसाय पुढे नेण्याचा बिझनेस जत्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. जास्तीत जास्त लघु आणि मध्यम उद्योजक त्याचप्रमाणे व्यावसायिकांनी बिजनेस जत्रेला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.