Sunday, May 17, 2026

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये ( Dr. Vasantrao Pawar Medical College) आज (सोमवार) दुपारी १२ वाजेच्या सुमारास लिफ्ट कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या झालेल्या लिफ्ट अपघातात (Lift Accident) एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात ज्योती शिवाजी आहिरे (५०, रा. मानेनगर, अमृतधाम) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ज्योती आहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होत्या. ऑपरेशन थिएटरमधील साहित्य ने आण करण्यासाठी एका लिफ्टचा (Lift) वापर केला जातो. नियमानुसार या लिफ्टमधून मानवी वाहतूक होत नाही.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

डोके आणि मणक्याला गंभीर दुखापत

मात्र आहिरे यांना लिफ्टचा दरवाजा उघडा दिसला. कुतूहलापोटी त्या लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावून पाहत असतानाच वरच्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली. वरतून आलेल्या लिफ्टचा तडाखा बसल्याने ज्योती आहिरे यांचे डोके आणि मान लिफ्टमध्ये अडकली. या भीषण दुर्घटनेत (Lift Accident) त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर रक्तदाब देखील (बीपी) मोठ्या प्रमाणावर खालावला आहे.

घटनास्थळावर रक्ताचा सडा अन लेकाचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने रुग्णालयाकडे धाव घेतली. घटनास्थळावरील रक्ताचा सडा आणि आईची अवस्था पाहून मुलाने केलेला आक्रोश हा काळीज चिरणारा होता. या गंभीर घटनेनंतर मेडिकल कॉलेज प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.

लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का, याची तपासणी आता केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील जेलरोड (Jail Road Area) परिसरात देखील अशीच लिफ़्ट दुर्घटना (Lift Accident) घडली होती त्यामुळे शहरातील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >