Thursday, July 3, 2025

नववर्षातील धक्कादायक घटना, क्षुल्लक वादातून आई-बहि‍णींना यमसदनी धाडले

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील लखनऊमधून नव्या वर्षाच्या सुरुवातीला एक धक्कादायक वृत्त आले आहे. लखनऊमधील एका हॉटेलमध्ये पाच जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये चार मुली आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी मुलाला अटक केली आहे. मुलावर आई आणि चार बहि‍णींच्या हत्येचा आरोप आहे. संशयित आरोपी मुलाचे नाव अर्शद असे आहे. तो २४ वर्षांचा आहे. क्षुल्लक कौटुंबिक वादातून अर्शदने हे धक्कादायक कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. क्षुल्लक वादातून अर्शदने धारदार ब्लेडने पाच जणांची हत्या केली. अर्शदचे वडील बदर हे फरार आहेत. पोलीस त्यांना शोधत आहेत.





अर्शद त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह इस्लाम नगर, तेधी बगिया, कुबेरपूर, आग्रा येथे वास्तव्यास होता. तो लखनऊ येथील हॉटेलमध्ये घरच्यांसह का आला ? घरातील सदस्यांच्या हत्येमागचे नेमके कारण ? अर्शदच्या वडिलांच्या फरार होण्यामागचे कारण ? आणि अर्शदचे वडील कुठे आहेत ? ते समोर येणे का टाळत आहेत ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.





पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील नाका परिसरातील हॉटेल शरणजीतमध्ये अर्शदची आई अस्मा तसेच अर्शदच्या बहिणी आलिया (९), अलशिया (१९), अक्सा (१६) आणि रहमीन (१८) यांचे मृतदेह आढळले. सर्वांची धारदार ब्लेडने हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामागे गैरसमज किंवा अंधश्रद्धा अथवा कौटुंबिक प्रतिष्ठा जपण्याची धडपड असे नेमके कोणते कारण आहे हे जाणून घेण्यासाठी तपास अद्याप सुरू आहे. अर्शदचे वडील बदर यांचाही शोध सुरू आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याआधी सर्व शक्यतांचा सखोल तपास करणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Comments
Add Comment