ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या कारवाईत डिसेंबर महिन्यात संपूर्ण महापालिका क्षेत्रात २६०६ नळ जोडण्या खंडीत केल्या असून ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, ७३ पंप रुम सील करण्यात आले आहेत. तर, २३३० थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या काळात ७७.९८ कोटी रुपयांची बील वसुली करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात २१.८५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत.
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि मीटर रिडर यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.
माजिवडा मानपाडा – १४,८६,४८,१४८ वसुली
नौपाडा – कोपरी – १०,२१,८९,३८९ वसुली
वर्तकनगर – ७,७५,१४,७९० वसुली
उथळसर – ६,५२,६०,८३५ वसुली
कळवा – ०८,०८,१०,७६५ वसुली
वागळे – ४,०६,२२,५७० वसुली
लोकमान्य- सावरकर – ०५,९५,२०,९०५ वसुली
मुंब्रा – ६,४७,३२,७७९ वसुली
दिवा – ०६,८४,२७,५१४ वसुली
मुख्यालय-सीएफसी – ०७,२०,२८,५८५ वसुली
एकूण – ७७,९७,५६,२८०